राष्ट्रीय महामार्गासह परभणीतील रस्ते अतिक्रमणांनी व्यापले  

सकाळ वृतसेवा 
Thursday, 17 December 2020

परभणी शहरातील जिंतुर रोडवर आता व्यावसायिकांनी रस्त्यावरच आपले मोठ-मोठे व्यवसाय थाटले आहेत. तसेच शहरात रस्त्यांचा अर्धाभागावर हातगाड्यांचा कब्जा झाला आहे. 

परभणी ः शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह शहरातील सर्व मुख्य रस्त्यांना अतिक्रमाणांचा विळखा पडलेला आहे. दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत असून रस्त्यावरून चालणे देखील जिकरीचे झाले आहे. असे असतांना देखील पालिका प्रशासनासह संबंधीत अधिकाऱ्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष चालवले असल्याचे चित्र आहे. 

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर विसावा फाट्यापासून खानापुर फाट्यापर्यंत शाळा, महाविद्यालये, कार्यालयांच्या, घरांच्या संरक्षक भिंतीसह मोकळ्या जागा, मैदाने अतिक्रमाणांनी व्यापली आहेत. शंभर फुटांचा सांगण्यात येणारा हा राष्ट्रीय महामार्ग जेमतेम ५०-६० फुटाचा राहिला आहे. अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीला असलेल्या अतिक्रमण धारकांनी आता रस्त्यांच्या साईडपट्यावर कब्जा केला असून ग्राहकांना रस्त्यावर वाहने लावूनच खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

या भागाला अतिक्रणांचा विळखा 
फळांचे ढेले, चहाच्या टपऱ्या, विक्रीसाठीची वाहने, हॉटेल्स, चाट भांडार, विविध व्यावसायिकांची दुकाने व त्यांचे साहित्य गॅरेजेस, बंद पडलेली वाहने, हातगाडे अशा अतिक्रमणांची रेलचेल झालेली आहे. विसावा फाटा, महाराणा प्रताप चौक, दर्गा रोड कमान, महावितरण कार्यालय, आयटीआय, जिल्हा परिषद, बसस्थानक, रेल्वेस्थानक, शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी नगर, राजगोपालाचारी उद्यान, काळी कमान, खानापुर फाटा येथील चौक व परिसराला अतिक्रणांचा विळखा पडलेला आहे. 

हेही वाचा - हिंगोली : अवैध धंद्याला लगाम लावण्यास सेनगावच्या पोलिस निरीक्षकांसमोर आव्हान

अंतर्गत रस्त्यावर देखील वाढली अतिक्रमणे 
शहरातील मुख्य रस्त्यांची परिस्थिती काही वेगळी नाही. विद्यानगर ते बसस्थानक-रेल्वेस्थानक, रेल्वेस्थानक ते अपना कॉर्नर, एसीबीआय ते शिवाजीनगर, मोठा मारोती ते उघडा महादेव, वांगी रोड, धाररोड, खंडोबा बाजार, गंगाखेड रोड, नवा-जुना मोंढा शहरात कोणत्याही रस्त्यावर गेले तर रस्त्यापर्यंत अतिक्रमणे थाटल्याचे दिसून येते. कोरोनाच्या काळात शहराच्या बाजारपेठेत हातगाड्यांना मज्जाव करण्यात आला होता. आता सर्वत्र हातगाड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. 

हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात खरीप पिकांची अंतीम पैसेवारी ४८.३५ टक्के

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष 
महापालिकेला नवे आयुक्त मिळाले आहेत. दोन पूर्णवेळ उपायुक्त देखील रुजू झाले आहेत. परंतू, अतिक्रणमे त्यांच्या दृष्टीपथात आल्याचे दिसून येत नाही व न कधी त्याबद्दल चर्चा, बैठका होतात. तीच परिस्थिती पोलिस प्रशासनाची आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी शहर वाहतुक शाखेची आहे. परंतू, ही शाखा देखील थातुरमातुर कारवाई करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. अतिक्रमणांमुळे जागोजागी होणारी वाहतुकीची कोंडी, नागरिकांचे होणारे हाल त्यांच्या खिजगिणतीतही नसल्याचे दिसून येते. प्रशासनाचे निर्णय नागरीकांच्या हितांचे असावेत असे बोलले जाते. परंतु येथे मात्र अवैध कामे करणाऱ्यांचेच हित जोपासल्या जात असल्याचे चित्र आहे. 

 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads in Parbhani along the National Highway were encroached, Parbhani News