संचारबंदीत गायत्री परिवाराने बजावली विघ्नहर्त्याची भूमिका

Gayatri pariwar
Gayatri pariwar

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी सुरू आहे. या संचारबंदीचा फटका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण व नातेवाईकांना बसत आहे. रुग्ण व नातेवाईकांची जेवणासाठी होत असलेली परवड लक्षात घेता हिंगोलीतील गायत्री परिवार व विघ्‍नहर्ता ग्रुपचे पदाधिकाऱ्यांनी मोफत भोजन देण्यास सुरवात केली आहे. चार दिवसांत २५० पेक्षा अधिक गरजूंनी याचा लाभ घेतला.

जिल्‍ह्यात रविवारपासून (ता.२२) जमावबंदी व संचारबंदी कायदा लागू झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी म्‍हणून जिल्‍हा प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर फिरणे बंद केले आहे. शहरातील अनेक खासगी रुग्णालयात रुग्ण काही दिवसांपासून उपाचार घेत आहेत. त्यांच्या सोबत त्‍यांचे नातेनाईक देखील आहेत. शहरातील अत्‍यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. 

दररोज दोनशे थाळीचे वाटप 

त्‍यामुळे खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. शहरातील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात शिव भोजन योजनेमार्फत दररोज दोनशे थाळीचे वाटप होत आहे. मात्र खासगी रुग्णालयात अशी व्यवस्‍था नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. ही गरज ओळखून शहरातील गायत्री परिवार ट्रस्‍ट व विघ्नहर्ता ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णाच्या भोजनाची व्यवस्‍था करण्याचा निर्णय घेतला.

संचारबंदीच्या काळात दिलासा

रविवारपासून (ता.२२) ते बुधवारपर्यंत (ता.२५) खासगी रुग्णालयातील रुग्ण व त्‍यांचे नातेवाईक असे २५० पेक्षा अधिक जणांना सकाळ व सायंकाळी दोन वेळेस मोफत भोजनाची व्यवस्‍था केली आहे. शहरातील कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण आहेत, याची माहिती घेत व त्‍यापैकी गरजुंना त्‍यांच्या बेडवर डब्‍बा पुरविला जात आहेत. त्यामुळे रुग्ण व त्‍यांच्या नातेंवाईकांतून संचारबंदीच्या काळात दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

पदाधिकाऱ्याचे सर्वस्‍तरातून कौतुक

 संचारबंदीच्या काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह, जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी देखील चहा व शरबतची मोफत व्यवस्‍था करण्यात आली आहे. शहरातील रेल्‍वेस्‍थानक, बसस्‍थानक येथे अडकून पडलेल्या काही प्रवाशांना देखील डब्याची व्यवस्‍था केली जात आहे. बंदच्या काळात गायत्री परिवार व विघ्‍नहर्ता ग्रुपतर्फे केल्या जात असलेल्या कामाचे सर्वस्‍तरातून कौतुक केले जात आहे. 

पायी येणाऱ्या नागरिकांना भोजन

दरम्‍यान, सावरखेडा(ता. हिंगोली) येथील काही मजूर हळद काढणीच्या कामाला जालना जिल्‍ह्यात गेले होते. कोरोनामुळे जिल्ह्याची सीमा बंद करण्यात आल्याने त्यांनी गावी येण्याचा निर्णय घेतला. मात्र बस व रेल्‍वेसेवा बंद असल्याने त्‍यांनी पायी जाण्याचा बेत आखला. जालना ते हिंगोली असा पायी प्रवास करीत आले. ते उपाशीपोटी असल्याचे समजताच गायत्री परिवार व विघ्‍नहर्ता ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी त्‍यांची हिंगोली येथील बसस्‍थानक परिसरात भेट घेवून भोजनाची व्यवस्‍था केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com