रात्री व्हाॅट्सअपवर फोटो व्हायरल, जागले ते वाचले, झोपले ते कायमचे झोपले

रवींद्र भताने
गुरुवार, 26 मार्च 2020

पुणे येथील दवाखान्यात एक मूल जन्मलं, अन जन्मतःच भविष्यवाणी केली की, आज "जे जागले तेच जगले आणि झोपले ते झोपले " या अफवेने अख्खे गावचे गाव रस्त्यावर येऊन जागून रात्र काढली. अनेकांनी आपल्या नातेवाईकांना फोन लावून जागे केलं. अनेकांनी आपल्या नातेवाईकांची यादी करून फोन केले आपले कोणतेही चुकू नये, याची खात्री करून जागे केले जात होते.

चापोली (ता. चाकूर, जि. लातूर) : लातूर येथील सरकारी दवाखान्यात एक मुलगा जन्मला असून तो जन्मल्यावर 'लागलीच कोणीही झोपू नका,' असे बोलू लागला. ही अफवा वणव्यासारखी पसरली आणि येथील येथील नागरिक बुधवारी (ता. २५) मध्यरात्री पासून गुरुवारी (ता. २६) पहाटेपर्यंत रात्रभर जागे राहिले होते.

सध्या कोरोनाच्या धास्तीने नागरिक घरातच बसले आहेत. बुधवारी (ता. २५) मध्यरात्री बाहेर गावावरून फोन येण्यास सुरुवात झाली. लातूर येथे एक विचित्र घटना घडली आहे. सरकारी दवाखान्यात एक मुलगा जन्मला असून तो जन्मल्यावर लागलीच बोलू लागला. 

'आज रात्री जो झोपेल तो सकाळी उठणारच नाही, तो मरेल. जो रात्रभर जागा राहील तोच वाचेल,'' अशी अफवा रात्रभर वणव्यासारखी फसरली. पुणे, मुंबई, नांदेड येथुन येथील नागरिकांना असे फोन आल्याने नागरिकांनी रात्री घराबाहेर पडत रात्र जागून काढली.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

कोरोनाच्या भीतीने नागरिकांची आधीच झोप उडाली आहे. संचारबंदी मुळे कोणालाही घरा बाहेर फिरता येत नाही. त्यात अशा अफवामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण रात्री पसरले होते.

नागरिकांनी अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आज पंतप्रधान व मुख्यमंत्री जे सांगत आहेत त्या गोष्टीवर विश्वास ठेवून घरी बसा. बाळ जन्मल्यावर लगेच बोलेल या फक्त अफवा आहेत. सोशल मीडियावर ही कोणतीही पोस्ट टाकण्याअगोदर त्याची शहानिशा करा. नागरिकांत भीती निर्माण होईल, अशा गोष्टी सोशल मिडीयावर टाकू नका.
- जयवंत चव्हाण, पोलिस निरीक्षक, चाकूर.

उजनीच्याही ग्रामस्थांनी काढली रात्र जागून

उजनीतही बुधवारी (ता.२५) रात्री येथील ग्रामस्थांनी रात्र जागून काढल्याची घटना घडली आहे. लातूर येथील एका दवाखान्यात विचित्र दिसणाऱ्या मुलाचा जन्म झाला असून त्याने आज रात्री जे झोपतील ते मरतील आणि जे जागे राहतील ते वाचतील असे म्हणले असल्याची अफवा परिसरात वेगाने पसरली.

जो तो आपआपल्या नातेवाईकांना संपर्क साधून यासंदर्भात सांगून जागे राहण्यास सांगत होता. या गोष्टी वर विश्वास ठेवून येथील लोकांनी रात्रभर जागरण केले, असे 'सकाळ'ते बातमीदार केतन ढवण यांनी सांगितले. 

कोणता नातेवाईक चुकू नये, म्हणून यादी करून केले फोन 

मदनसुरी येथील 'सकाळ' बातमीदार सिद्धनाथ माने यांनी सांगितले, की पुण्यात एक महिलेची डिलव्हरी झाली आहे. जन्मलेल्या लेकराने आज दोन वाजेपर्यंत जग बुडणार आहे. "जे जागे आहेत वाचतील झोपले ते झोपले" या अफवेने निलंगा तालुक्यातील अनेक गावे रात्र जागून काढली.काही गावात लातूर येथील दवाखान्यात मुल जन्मले अशी अफवा पसरली होती.

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

सध्या मदनसुरीसह परिसरातील रामतीर्थ, कोकळगाव, सरवडी, मुदगड, डोंगरगाव, धानोरासह अनेक गावातील कोरोनाची धास्ती घेतलेल्या नागरिक व शेतकरी आपला दिवस शेतात कामात घालून रात्री विसाव्यासाठी गावात येत आहेत. मात्र बुधवारच्या मध्य रात्री व्हाट्सएपवर लहान मुलाच्या फोटो व्हायरस झाल्या अन एकच खळबळ माजली. 

पुणे येथील दवाखान्यात एक मूल जन्मलं, अन जन्मतःच भविष्यवाणी केली की, आज "जे जागले तेच जगले आणि झोपले ते झोपले " या अफवेने अख्खे गावचे गाव रस्त्यावर येऊन जागून रात्र काढली.

अनेकांनी आपल्या नातेवाईकांना फोन लावून जागे केलं. अनेकांनी आपल्या नातेवाईकांची यादी करून फोन केले आपले कोणतेही चुकू नये, याची खात्री करून जागे केले जात होते.

त्यामुळे अनेक गावात रात्रभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.ग्रामीण भागात कोरोनामुळे भीतीचे वातावरण आणि त्यात या जगबुडी, भूकंप या अफवेने सामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roumors In Latur About Coronavirus Pune Maharashtra News