उमरगा आरटीई प्रवेश : प्रतिक्षा यादीतील ४८ जणांना संधी 

अविनाश काळे
Thursday, 24 September 2020

उमरगा :  मुदतवाढीत १०२ विद्यार्थ्यांचे झाले ऑनलाईन प्रवेश ; प्रतिक्षा यादीबाबत संभ्रम

उमरगा (उस्मानाबाद) : २०२०-२१ आरटीईच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात १०२ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश झाले आहेत. दरम्यान प्रवेशासाठी निवड झालेल्या उर्वरीत ४८ विद्यार्थ्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमानुसार ज्या त्या शाळेत प्रवेश देण्याचे नियोजन सुरू आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत व्यत्यय आल्याने प्रवेश प्रक्रिया विलंबाने करावी लागली. ३१ ऑगस्टपर्यंत ९५ विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तालुक्यातील इंग्रजी व मराठी माध्यमाच्या २३ विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली वर्गासाठीच्या १६६ प्रवेशासाठी लॉटरी पद्धत झाली होती. त्यात १५४ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली होती तर १४ प्रवेशासाठी १२६ विद्यार्थ्याची प्रतिक्षा आहे. परंतू १५ सप्टेंबरच्या मुदतीत १०२ प्रवेश निश्चित झाले. चार प्रवेशाचे प्रस्ताव नामंजूर झाले. आता ४८ प्रवेशासाठी १२६ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी आहे. दरम्यान लॉटरी पद्धत होऊन काढून पाच महिने झाले होते मात्र लॉकडाउनमुळे सर्व शाळा बंद असल्याने रितसर प्रवेश घेण्यासाठी अडचणी आल्याने ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रियेसाठी अडचणी आल्या होत्या. तालुक्यातील २३ शाळेत इयत्ता पहिली वर्गासाठी १५४ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आल्यानंतर पालक, पाल्यांनी शाळेत रितसर कागदपत्रे जमा करायचे होते. ३१ ऑगस्टपर्यंत एकुण ९५ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित केले होते त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतर केवळ सात विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले.  

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रतिक्षा यादीबाबत संभ्रम
विविध शाळेत १६६ जागा आरटीईसाठी आहेत. त्यातील १५४ जागेसाठी प्रवेश निश्चितीचा लॉट काढण्यात आला. उर्वरीत चौदा जागा भरण्यासाठी प्रतीक्षा यादी तयार केली होती मात्र मंजूर जागेपैकी १०२ जागा भरल्यानंतर ४८ जागेसाठी १२६ जणांची प्रतिक्षा यादी तयार आहे त्यांना क्रमानुसार प्रवेश देण्याचे नियोजन सप्टेंबर अखेरपर्यंत होणार आहे. परंतू पूर्वी जाहिर केलेल्या चौदा जागा प्रवेशाला प्रतिक्षा यादीत स्थान दिलेले नाही. वास्तविकात : शिल्लक ४८ जागा आणि पूर्वीच्या चौदा अशा ६४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला हवा.
 

"आरटीईच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १०२ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश झाले आहेत. प्रतिक्षा यादीतील क्रमानुसार ४८ प्रवेश प्रक्रियेचे नियोजन सुरू आहे. प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित पाल्य, पालकाच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील. - शिवकुमार बिराजदार, गट शिक्षणाधिकारी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE Admission waiting list umarga news