Video : साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, शिर्डी-पाथरी वादाला नवे तोंड

दत्ता देशमुख, बीड
मंगळवार, 21 जानेवारी 2020

साई बाबांनी बीडच्या हातमागावर काम केल्याचा साईसच्चरित्रात उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे बीडच्या विकासासाठीही आता सरकारने निधी द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

बीड : संत साईबाबांची कर्मभूमी शिर्डी (जि. नगर) आणि जन्मभूमी पाथरी (जि. परभणी) यांच्यातील वाद उफाळलेला असतानाच साईबाबांनी बीडची भूमीदेखील पावन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी बीडमध्ये काही काळ एका हातमागावर काम केल्याचा दावा येथील संत साहित्याचे अभ्यासक करत आहेत.

कुठलाही तपस्वी आयुष्यात कधीच एकाच भागात, एकाच गावात राहत नसतो. भूतलावर अनेक भागांत मार्गाक्रमण करत आपल्या पदस्पर्शाने तो ती ती भूमी पावन करत असतो. तसे साईबाबांनी बीडलाही पायधूळ झाडून बीडकरांनाही पावन केले आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

एकेकाळी बीड जिल्ह्याचा आणि विशेषत: बीड व वडवणीचा हातमाग व्यवसायात लौकिक होता. तपस्वी असलेले साईबाबा त्या काळी बीडच्या एका हातमागाच्या कारखान्यात नोकरीला असल्याचा दावा येथील संत साहित्याचे अभ्यासक करत आहेत.

गुरूंसोबत फिरत बीडला आले बाबा

इंग्रज राजवटीला तो काळ होता. त्या काळी बाबांचे काम, सचोटी आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना पगडी भेट दिल्याचेही सांगितले जात आहे. त्यांचे गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांच्यासोबत ते बीडमध्ये फिरत आले होते.

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

दासगणू महाराजांच्या ग्रंथात तसा उल्लेख असल्याचे किर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक भरतबुवा रामदासी म्हणतात. विशेष म्हणजे साईबाबांनी बीडध्ये राहील्याचा उल्लेख साईचरित्रात देखील असल्याचे रामदासी म्हणतात.

दरम्यान, बीडमध्ये साईबाबांचे चार ते पाच वर्षे वास्तव्य होते. त्यामुळे बीडच्या विकासासाठीही आता सरकारने निधी द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saibaba Worked In Beed Shirdi News, The new face of the Shirdi- pathire debate