
उदगीर येथील सर्व्हे क्रमांक ३,१५५ ते ३३८ हे उदगीर नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
उदगीर (जि.लातूर) : उदगीर येथील सर्व्हे क्रमांक ३,१५५ ते ३३८ हे उदगीर नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या भागातील नागरिकाची नगपालिका हद्दीत समाविष्ट करण्याची अनेक दिवसांपासून मागणी होती. शासनाने आता मान्यता दिल्याची माहिती पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले की, उदगीर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. शहराचा विस्तार होत आहे. सर्व्हे क्रमांक ३,१५५ ते ३३८ मधील नागरिकांची अनेक दिवसांपासून नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी होती. हे सर्व्हे क्रमांक लगतच्या ग्रामपंचायतींमघ्ये समाविष्ट नव्हते. त्यामुळे येथील नागरिकांना महसुलीसह अन्य समस्या निर्माण होत होत्या. याबाबत राज्य शासनाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला शासनाने मान्यता दिली आहे.
हे भाग येणार पालिकेत
मलकापूर, सोमनाथपूर, निडेबन, पिंपरी, मादलापूर येथील काही सर्व्हे क्रमांक नगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. यात उदगीरच्या उत्तरेस सर्व्हे क्रमांक ९७ च्या उत्तर पश्चिम कोपरा ते सर्व्हे क्रमांक १९३ च्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत, पूर्व दिशेला सर्व्हे क्रमांक १९३ च्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून सर्व्हे क्रमांक २५४ च्या दक्षिण पूर्व कोपरा, दक्षिण दिशेला सर्व्हे क्रमांक २५४ दक्षिण पूर्व कोपरा ते सर्व्हे क्रमांक ३३२ च्या पश्चिम दक्षिण कोपऱ्यापर्यंत, पश्चिम दिशेला सर्व्हे क्रमांक ३३३ च्या दक्षिण पश्चिम कोपरा ते सर्व्हे क्रमांक ९७ उत्तर पश्चिमपर्यंत हद्द वाढीस शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित असलेली हद्दवाढीची मागणी सहा महिन्यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागली आहे. लातूर जिल्हा परिषद, औरंगाबाद विभागीय आयुक्त, मंत्रालयातील नगरविकास विभागात यासंदर्भात सतत पाठपुरावा केला गेला होता. आता हा प्रश्न मार्गी लागला आहे.
- संजय बनसोडे, राज्यमंत्री
Edited - Ganesh Pitekar