माजलगावातील वाळूमाफियांचे 'पाटील' शाहीला आव्हान!    

पांडुरंग उगले 
Wednesday, 18 November 2020

दोन टिप्पर पकडून अधिकाऱ्यांकडून लुटूपुटूची कारवाई 

माजलगाव (बीड) : प्रशासनाचा कायदेशीर ठेका नसतानाही माजलगावात मोठ्या प्रमाणात वाळूची बिनदिक्कत तस्करी सुरु आहे. रात्रीच्यावेळी मोठमोठे हायवा टिप्पर रस्त्यावरून सुसाट पळत असताना अधिकारी मात्र लुटुपुटूच्या कारवाईतच धन्यता मानत आहेत. महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांची “पाटील”शाही सुरु आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
गोदावरी, सिंदफणा नद्यांमुळे माजलगाव तालुका वाळूचे कोठार म्हणून ओळखला जातो. तालुक्यातून वाळूची तस्करी करण्यासाठी विविध जिल्ह्यातील माफियांनी येथे बस्तान बसवले आहे. बाराही महिने अनधिकृत वाळू उपसा सुरु राहत असल्याने माजलगावला येण्यासाठी अधिकाऱ्यांचीही चढाओढ लागलेली असते. सद्यस्थितीत वाळू उपसा करण्यासाठी जिल्हा प्रशाशानाचा कोणताही कायदेशीर ठेका, टेंडर निघालेले नसतानाही तालुक्यातून मोठ्याप्रमाणात वाळूची तस्करी सुरु झालेली आहे. मध्यरात्रीनंतर वाळूने भरलेले मोठमोठे हायवा टिप्पर रस्त्यावरून सुसाट पळत असताना महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत. कधीतरी एक, दोन टिप्परवर लुटुपुटूची कारवाईचा देखावा करण्यात अधिकारी धन्यता मानताना दिसत आहेत. सद्यस्थितीत गोदावरी नदीपात्रात पाणी असले तरी तालुक्यातील हिवरा, कवडगाव, रिधोरी, काळेगांव, डुब्बाथडी, सादोळा आदी नदीकाठच्या गावाशेजारी केणीसारख्या उपकरणाने वाळूचा उपसा करण्यात येत आहे. काही मंडळीकडून दिवसभर उपसा करून साठा केलेली वाळू रात्रीच्यावेळी टिप्परमध्ये भरून विक्रीसाठी नेली जाते. मध्यरात्रीनंतर सुरु असलेल्या वाळू तस्करीच्या खेळाची प्रशासनाला माहित असतानाही कारवाई केली जात नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रशासनातल्या ‘पाटलां’समोर आव्हान 
कोणताही ठेका, टेंडर नसतानाही मोठ्याप्रमाणात वाळूचा अनधिकृत उपसा करून तस्करी करण्यात येत आहे. प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून सुरु असलेली वाळू माफियांच्या ‘पाटील’शाहीला आळा घालण्याचे मोठे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश ‘पाटील’, तहसीलदार वैशाली ‘पाटील’, पोलीस निरीक्षक संतोष ‘पाटील’ यांच्या समोर निर्माण झाले आहे. 

दोन टिप्परवर कारवाई 
उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी बुधवारी (ता.१८) पहाटच्या दरम्यान वाळूने भरलेले दोन टिप्पर पकडले आहेत. यातील इतर दोन टिप्पर चालकांनी रस्त्यातच वाळू टाकून पोबारा केल्याचेही सांगण्यात आले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand mafia Majalgaon challenges Patil Shahi