esakal | एसबीआयने दत्तक गावेच सोडली वाऱ्यावर!
sakal

बोलून बातमी शोधा

sbi.jpg

पाचशेवर शेतकरी सभासद अद्याप पीककर्जाच्या प्रतीक्षेत 

एसबीआयने दत्तक गावेच सोडली वाऱ्यावर!

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येथील शाखेत तालुक्यातील १५ गावे दत्तक आहेत. या दत्तक गावांतील शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा या बँकेमार्फत केला जातो. दरवर्षी पीककर्ज जून, जुलैमध्ये वाटप होते. यंदा मात्र या बँकेतील दत्तक गावांतील सहा महिन्यांनंतरही ५०० शेतकऱ्यांचे पीककर्ज अद्यापही वाटप झालेले नाही. दत्तक गावातील शेतकरी आजही पीककर्जाच्या प्रतिक्षेत आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
या बँकेशी संबंधित १५ दत्तक गावांतील जवळपास दोन हजार २०० पीककर्जाच्या फाईल बँकेत दाखल करण्यात आलेल्या आहेत. आजपर्यंत यापैकी सहा महिन्यात फक्त एक हजार ७०० शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. आणखी ५०० पीककर्जाच्या फाईल प्रलंबित आहेत. या शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी केलेला माल घरी घरी आला तरी पीककर्ज मिळत नाही. पीककर्जासंदर्भात नेमके कोणाशी संपर्क करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण दिवाळीच्या सुट्यानंतर या बँकेतील कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित नाहीत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हा विभाग पूर्णपणे बंद आहे. शेतकरी रोज बँकेत जाऊन चौकशी करत आहेत पण त्यांना दाद दिली जात नाही. पण नेमका आपला नंबर कधी येणार, कोणत्या गावचे वाटप झाले, कोणत्या गावातील राहिले याची माहिती नेमकी कळणे आवश्यक आहे. दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीककर्जाचे प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढून पीककर्ज वाटप तात्काळ करावे असे आदेश जिल्ह्यातील बँकांना दिले होते मात्र बँकेने त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मॅनेजर देतात एक तारखेची हमी.... 
यासंदर्भात बँकेतील शाखाधिकारी अनंत किशोर नाग यांच्याशी दै. सकाळच्या प्रतिनिधींनी संपर्क साधावा असता त्यांनी सांगितले की, या शाखेतील काही पीककर्ज वाटप करायचे राहिले आहेत. पण शाखेत कर्मचारी कमी आहेत. काही कर्मचारी सुट्टीवर आहेत. यामुळे एक डिसेंबरनंतर राहिलेले पीककर्ज वाटप केले जाईल. सारडगाव येथील शेतकरी लहू राम तांदळे यांनी सांगितले की, मी जून महिन्यात या बँकेत पीककर्जाची फाईल दाखल केली आहे. सहा महिन्यात १०० च्या वर चकरा मारल्या असून दिवाळी नंतर कृषी विभागात एकही कर्मचारी उपस्थित नाही. व्यवस्थापक भेटत नाहीत. आम्ही दाद कोणाकडे मागायची?, असा प्रश्न श्री.तांदळे यांनी केला आहे. 


(संपादन-प्रताप अवचार)

loading image