स्कूल फ्रॉम होम; सोशल मीडियातून अभ्यासाचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 April 2020

बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घरी बसूनच शिक्षकांकडून अभ्यासाचे धडे गिरविता येणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या या संकल्पनेला शिक्षण विभागानेही प्रतिसाद दिला आणि कामाला सुरवात केली आहे.

बीड - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शाळा बंदचा निर्णय अगोदरच झाला होता. त्यानंतर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. विद्यार्थी सुटीचा आनंद घेत आहेत, तर काही घरी बसून अभ्यास करीत आहेत; परंतु या काळात बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घरी बसूनच शिक्षकांकडून अभ्यासाचे धडे गिरविता येणार आहेत. 

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या या संकल्पनेला शिक्षण विभागानेही प्रतिसाद दिला आणि कामाला सुरवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता विद्यार्थी शिक्षकांकडून अभ्यासाचे धडे गिरविणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा बंदचा निर्णय घेतला होता. या काळात दहावीचा उर्वरित पेपरही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

दरम्यान, संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर झाले; परंतु अत्यावश्यक सेवांसाठी सोशल डिस्टन्सिंगसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना पुढे आली. मात्र, जिल्ह्यातील लाखो शालेय विद्यार्थी सध्या सुटीचा आनंद घेत आहेत. तर काही घरी बसून अभ्यास करीत आहेत. त्यांचा उर्वरित अभ्यासक्रम अपूर्ण आहे. त्यावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ‘स्कूल फ्रॉम होम’ हा नवा धडा समोर आणला आहे. इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक धडे देणार आहेत. 

हेही वाचा - मजुरांचे जत्थे पायीच निघाले गावाच्या प्रवासाला

असे देणार विद्यार्थ्यांना धडे 
‘स्कूल फ्रॉम होम’ उपक्रमासाठी शिक्षण विभागातील ११ तज्ज्ञांचा अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून अभ्यासक्रमाचे सोशल मीडिया व विशेषतः: व्हॉट्सॲपवरून गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व नंतर शिक्षकांच्या मोबाईलवर हा अभ्यासक्रम पाठविण्यात येईल. यात शैक्षणिक घटक शिकविण्यासाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे, ऑनलाइन टेस्ट, प्रश्नावली, निबंध लेखन, मूल्यमापन विद्यार्थ्यांपर्यंत पाठविण्यात येईल. यातूनच व्हर्च्युअल क्लासरूमसंदर्भात सर्व शिक्षकांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

हेही वाचा - परळीतील एक लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात

कृती गटाचे समन्वयक म्हणून उपशिक्षणाधिकारी प्रवीण काळम पाटील यांच्यासह तंत्रस्नेही शिक्षक अशोक निकाळजे, विशाल घोलप, जगन्नाथ जाधव, विशाल कुलकर्णी, संतोष कोठेकर, सौदागर कांबळे, सतीश वराट, धर्मनाथ करपे, सोमनाथ वाळके, अण्णासाहेब घोडके, तात्यासाहेब मेघारे, तानाजी जाधव, गणेश जाधव या शिक्षकांचा यात समावेश आहे.. या गटाने आठ पानांची पीपीटी तयार केली असून यातून झालेल्या अभ्यासाचा सराव, मूल्यमापन व पुढच्या वर्गाच्या तयारीचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी पाठांतर, घोकंपट्टीऐवजी स्वतःचा विचार मांडावा, असे नियोजन आहे. विविध कौशल्यांवर आधारित विचारप्रवर्तक प्रश्न तयार करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School from Home; Study lessons from social media