हिंगोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांविना शाळा होणार सुरू..?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी सोमवारी शाळेत सकाळी साडेनऊ ते दुपारी चार या वेळेत उपस्थित राहावे, परंतु, विद्यार्थ्यांना मात्र शाळेत बोलावू नये, तसेच शाळा सुद्धा भरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत

हिंगोली : जिल्ह्यातील शिक्षकांना सोमवारपासून (ता. २२) शाळेच्या वेळेत शाळेवर हजर राहण्याच्या सूचना शिक्षणविभागाने सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. मात्र, याबाबत लेखी आदेश न काढता केवळ व्हॉट्सॲपवरून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून लेखी पत्र काढण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी सोमवारी शाळेत सकाळी साडेनऊ ते दुपारी चार या वेळेत उपस्थित राहावे, परंतु, विद्यार्थ्यांना मात्र शाळेत बोलावू नये, तसेच शाळा सुद्धा भरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - पोलिस मुख्यालयातच कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या -

शिक्षकांची आरोग्य तपासणी करावी

शाळेमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केलेला असतील त्या शाळेचे ग्रामसेवक, सरपंच यांच्या मदतीने निर्जंतुकीकरण करून घ्यावे. नागरिकांना क्वारंटाइन केलेल्या शाळा इमारतीत शिक्षकांनी जावू नये. तसेच उन्हाळी सुटीमुळे मूळ गावी, बाहेर जिल्ह्यात गेलेल्या, बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची आरोग्य तपासणी मुख्याध्यापकांनी नजीकच्या शासकीय दवाखाण्यात करण्याबाबत सूचना द्यावी.

पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप

 इयता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी अंगणवाडी ताईंकडून हस्तगत करावी, शाळेमध्ये काम करतांना सामाजिक अंतरचे पालन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय मुख्याध्यापक व शिक्षकांनी (ता.१५) शासन परिपत्रकातील प्रवेश धरवडाबरोबरच पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करणे.

विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ माहिती द्यावी

जुनी पुस्तके विद्यार्थ्यांकडून जमा करून शाळेत ठेवावीत, एसएमसी व एसएमडीसी यांची सामाजिक अंतर पाळून बैठक घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. गावात नवीन आलेल्या विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ माहिती देण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन, साधे फोन, टीव्ही (चॅनलसह), रेडिओ याचे सर्वेक्षण करून माहिती द्यावी.

शिक्षक मित्राची नेमणूक करावी

मुलांनी घरी स्वयंअध्ययन केल्यानंतर भ्रमणध्वनीद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करावे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी शिक्षक मित्राची नेमणूक करावी. पालक व विद्यार्थ्यांच्या भेटी घ्याव्यात, अशा सूचनाही शिक्षण विभागाने केल्या आहेत.

मोडकळीस वर्गखोल्यांची माहिती सादर करावी

मोडकळीस वर्गखोल्यांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी बसू नये, मोडकळीस वर्गखोल्यांची माहिती केंद्रप्रमुख यांनी तालुका स्तरावर मंगळवारपर्यंत द्यावी, सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमोशन करावेत, बाकी असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून घेण्यात यावेत, शिक्षकांनी मोबाइलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करून घ्यावा, आशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी मुख्याध्यापकाना दिल्या आहेत.

येथे क्लिक करा हिंगोली जिल्ह्यातील अकरा गावे ठरली हॉटस्‍पॉट -

 
शाळा समितीचा अभिप्राय घ्यावा

हिंगोली: कोरोना प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्‍थापन समितीचा स्‍वयंस्‍पष्ट अभिप्राय सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शुक्रवारी (ता. १९) मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा

यासंदर्भांत शाळा व्यवस्‍थापन समिती, शाळा समिती, शिक्षक, पालकांसाठी सभेचे आयोजन करावे, सदर सभेत शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करावे, त्‍याअनुषंगाने सर्वकष चर्चा घडवून आणावी, यात शाळा सुरू करण्याबाबतचा स्‍वयंस्‍पष्ट अभिप्राय घेण्यात यावा, हा अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा, अशा सूचना श्री. शर्मा यांनी दिल्या आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School to start without students in Hingoli district ..?