esakal | दरोडेखोरांनी वाहन अडवले; प्रवाशांना मारहाण करित लुटला सात लाखांचा ऐवज
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

येरमाळा परिसरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.२८) मध्यरात्री दरोडेखोरांनी एका चारचाकी वाहनाला अडवले.

दरोडेखोरांनी वाहन अडवले; प्रवाशांना मारहाण करित लुटला सात लाखांचा ऐवज

sakal_logo
By
दीपक बारकुल

येरमाळा (जि. उस्मानाबाद) : येरमाळा परिसरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.२८) मध्यरात्री दरोडेखोरांनी एका चारचाकी वाहनाला अडवले. प्रवाशांना चाकू, काठीने मारहाण करीत रोख रक्कम, मोबाईल, २० तोळे सोने, मनगटी घड्याळ असा एकूण सातलाख १२ हजार सहाशे रुपयाचा लुटून नेला ही घटना नाथवाडी पाटीजवळ घडली.

पंढरपूर येथील लाड कुटुंबीय अकोला येथे लग्नासाठी चारचाकीने (एमएच-१३, सीएस-७३०८) गेले होते. ते येडशीमार्गे पंढरपूरला परतत होते. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नाथवाडी पाटीजवळ वाहनाखाली काहीतरी वाजल्याचा आवाज आल्याने चालकाने वाहन उभे केले. यावेळी वाहनाखाली जॅक दिसला. दरम्यान, रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या अनोळखी सहाजणांनी चालकावर हल्ला केला.

चालकाला चाकू, काठ्याने मारहाण केली. शिवाय दमदाटी करून वाहनातील दोन महिला तीन पुरुषांकडे असणारे ३१ ग्रॅम सोन्याच्या सात अंगठ्या, दोन ४१ ग्रॅमचे गंठण, एक ३५ ग्रॅमची सोन्याची चैन, ७० ग्रॅम सोन्याचा हार, कानातले असे २० तोळे सोने, मोबाईल फोन आणि रोख ६१ हजार रुपये असा एकूण सात लाख बारा हजार सहाशे रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला.

या प्रकरणी निखिल विजय लाड (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे मंगळवारी सकाळी दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकरण काशीद यांनी घटनास्थळाची पाहणी केली.निवडला होता सोयीचा रस्ता
येरमाळा ते पंढरपूर रस्ता म्हणजे खामगाव-पंढरपूर रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे लाड कुटुंबीयांनी येडशी मार्गे पंढरपूरकडे जाण्याचा सोयीचा रस्ता निवडला. या रस्त्यावर येताच अवघ्या पाच मिनिटांत दरोडेखोरांनी त्यांचे वाहन अडविले. त्यामुळे या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी मलकापूर येथील सुंदर लोमटे यांनी केली.

Edited - Ganesh Pitekar

loading image