वकिलीणबाई शिवताहेत गरजूंसाठी मास्क 

बाबासाहेब गोंटे
Wednesday, 13 May 2020

कोरोनापासून बचावासाठी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे, अनेक गरजूंनी विकतचा मास्क घेणे परवडत नाही. शिवणकामाचे कौशल्य असल्याने समाजातील गरजू, कष्टकऱ्यांसाठी वॉशेबल कापडी मास्क शिवता येतील हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दररोज मास्कच्या शिवणकामासाठी वेळ देणे सुरू केले.

अंबड (जि.जालना) -  लॉकडाउन असल्याने घरात बसून राहण्यापेक्षा शिवणकामाच्या कौशल्याचा समाजासाठी उपयोग करीत अंबडच्या वकिलीणबाई सध्या समाजातील गरजू, मोलमजुरी करणाऱ्यांसाठी कापडी मास्क तयार करीत आहेत. हे तयार झालेले मास्क त्यांनी गरजूंना वाटपही केले आहेत. ॲड. आशा गाडेकर यांचे हे कार्य सातत्याने सुरू आहे. 

वकिलीसोबतच विविध सामाजिक कार्यात ॲड. आशा गाडेकर अग्रेसर आहेत. महिलांना संघटित करणे, त्यांचे प्रश्न सोडविणे, विधायक व रचनात्मक कार्यात नेहमीच त्या सक्रिय सहभाग नोंदवितात.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

सध्या कोरोनामुळे लॉकडाउन आहे, सारेच घरात बसून आहेत. अर्थात, याला अपवादही आहेत. डॉक्टर, आरोग्य, आशा, अंगणवाडी सेविका महसूलचे कर्मचारी, स्वच्छता कामगार जनतेसाठी मैदानात लढा देत आहेत; पण अशा स्थितीत हातावर पोट असलेले भाजीपाला विक्रेते, शेतकरीही कष्ट घेत आहेत. लॉकडाउनच्या काळात आपणही समाजासाठी काही करावे ही भावना ॲड. आशा गाडेकर यांची होती.

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

कोरोनापासून बचावासाठी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे, अनेक गरजूंनी विकतचा मास्क घेणे परवडत नाही. शिवणकामाचे कौशल्य असल्याने समाजातील गरजू, कष्टकऱ्यांसाठी वॉशेबल कापडी मास्क शिवता येतील हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दररोज मास्कच्या शिवणकामासाठी वेळ देणे सुरू केले. त्यात शिवलेले अनेक मास्क त्यांनी गरजूंना वाटपही सुरू केले. 

लॉकडाउननंतर महिलांना करणार मार्गदर्शन 

पुढील काळात कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करावाच लागणार आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर महिलांना मास्कच्या शिवणकामाबाबत ॲड. गाडेकर मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कापडी पिशव्या शिवण्याचेही प्रशिक्षण महिलांना देण्याचा त्यांचा संकल्प आहे. 

लॉकडाउनच्या काळात समाजासाठी काहीतरी करावे म्हणून मास्कचे शिवणकाम सुरू केले आहे. पुढील काळात मोठ्या प्रमाणावर मास्कची गरज लागणार आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर ग्रामीण भागातील महिलांना मास्कच्या शिवणकामाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. सोबतच कापडी पिशव्या शिवण्याचेही प्रशिक्षण देणार आहे. ग्रामीण भागातील महिला कौशल्य विकसित करून स्वयंरोजगार मिळवतील, अशी अपेक्षा आहे. 
- ॲड. आशा गाडेकर, 
सामाजिक कार्यकर्त्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sewing masks for needy.