esakal | माजलगावच्या नगराध्यक्षपदी शेख मंजूर बिनविरोध; राष्ट्रवादीची सरशी, भाजपची कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

Shaikh Manjur

माजलगाव नगरपालिकेमध्ये भाजपा पुरस्कृत जनविकास आघाडीची सत्ता होती. गैरहजर असल्याच्या कारणावरून सहाल चाउस यांना नगराध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्यात आले होते.

माजलगावच्या नगराध्यक्षपदी शेख मंजूर बिनविरोध; राष्ट्रवादीची सरशी, भाजपची कोंडी

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : नगरपालिकेमध्ये भाजपा पुरस्कृत जनविकास आघाडीची सत्ता होती. गैरहजर असल्याच्या कारणावरून सहाल चाउस यांना नगराध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यावा लागला यामुळे भाजपाची कोंडी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी होत नगराध्यक्षपदी शेख मंजुर बिनविरोध आले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांचे नगरपालिकेवर निर्वीवाद वर्चस्व झाले आहे.
मागील चार वर्षांपूर्वी तत्कालिन आमदार आर. टी. देशमुख यांनी जनविकास आघाडीचे सहाल चाउस यांना भाजपा पुरस्कृत केले होते.

राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच : चंद्रकांत पाटील

थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत चाऊस नगराध्यक्ष झाले. चार वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर निधीही उपलब्ध झाला परंतु गैरव्यवहाराच्या कारणावरून नगराध्यक्ष चाऊस यांचेसह तत्कालीन मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांविरूध्द गुन्हे दाखल झाले होते. चाऊस यांना गैरहजर असल्याच्या कारणावरून बडतर्फ करण्यात आले होते. या रिक्त झालेल्या पदाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे केवळ सात नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेख मंजूर यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपकडून रेश्मा दीपक मेंडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

जनविकास आघाडीचे नगरसेवक आमदार सोळंके गटात दाखल झाले. तर सहाल चाऊस हे देखिल आमदार सोळंकेंच्या तंबूत डेरेदाखल झाले. यामुळे या निवडणुकीतील रंगतच निघून गेली. भाजपाच्या उमेदवार रेश्मा दीपक मेंडके यांनी उमेदवारी अर्जच मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. भाजपा उमेदवार रेश्मा मेंडके यांच्याकडे शेवट पर्यंत संख्याबळाची जुळवाजुळव झाली नाही. माजी मंत्री पंकजा मुंडे व मोहन जगताप, रमेश आडसकर यांनी मागील चार वर्षात सतत नगरपालिकेला दुर्लक्षीत केल्यामुळे भाजपाची पकड पालिकेवर कमी झाली व पर्यायाने तत्कालीन नगराध्यक्ष चाऊस यांचेसह मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले तर अल्पमतात असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची पालिकेत सत्ता आली आहे.

संपादन - गणेश पिटेकर