'मला शेतीतलं कळत नाही, पण...' : उद्धव ठाकरे

टीम ई-सकाळ
Sunday, 3 November 2019

पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा दौरा नसतो. ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी लागते.

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी सर्वप्रथम त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सर्वच्या सर्व जागा दिल्याबद्दल औरंगाबादमधील जनतेचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतची आपली भूमिका व्यक्त केली.

- संजय राऊंतांनी अजित पवारांना केला 'हा' मेसेज

'शेतकऱ्यांच्या तोंडासमोरचा घास पावसाने हिरावला आहे, त्यामुळे त्यांना दिलासा देण्याची ही वेळ आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता परिस्थितीवर मात करणं गरजेचं आहे. शिवसेना तुमच्या सोबत आहे. तसं मला शेतीतलं काही कळत नाही, मात्र शेतकऱ्यांचा डोळ्यात आलेले अश्रू मला दिसत आहे,' अशी भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली. 

ते म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत ही खूपच त्रोटक आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी 25 हजार रुपये प्राथमिक मदत दिली गेली पाहिजे, तरच त्याला पुढील हंगामाची कामे करता येतील. माझ्या राज्यातील बळीराजाला संकटातून मोकळं करण्यासाठी केंद्राकडूनही मला मदत हवीय.

- ज्याचे नुकसान झाले त्याला मदत मिळणारच : मुख्यमंत्री

ते पुढे म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवणे ताबडतोब थांबवावे. तसेच विमा कंपन्यांनीदेखील माणुसकीने वागावे, नाहीतर हेकेखोरांना सरळ करण्यास सेना सक्षम आहे. तसेच शिवसैनिकांनीही मैदानात उतरून शेतकऱ्याला मदत करण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.  

'पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा दौरा नसतो. ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी लागते,' असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला. तसेच 'हा पाऊसही मी पुन्हा येईन म्हणतोय, याचीच भीती हल्ली वाटते आहे, असा चिमटाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.

- भाजपला निवडून आणायचे नाही अशी मनस्थिती होती : शरद पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena party chief Uddhav Thackeray speaks during press conference in Aurangabad