उस्मानाबादेत दोन ठिकाणी मिळणार शिवभोजन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

प्रजासत्ताक दिनापासून दोन ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. 

उस्मानाबाद : शहरात प्रजासत्ताक दिनापासून दोन ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. 

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील अनिस सादिक कुरेशी यांच्या उपाहारगृहात थाळी वितरित केली जाणार आहे. याशिवाय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील संजय ज्ञानोबा कदम यांच्या शिवदीप उपाहारगृहात थाळीचा आस्वाद शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शिवभोजन थाळीची चर्चा होती. 

अशी असणार थाळी 

दिवसामध्ये एका व्यक्तीला एकदाच थाळी मिळणार आहे. केवळ 10 रुपयांमध्ये दोन चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूग भात व एक वाटी वरण असे असणार आहे. शहरी भागासाठी ही थाळी 50 रुपयांना तर ग्रामीण भागात 35 रुपये किंमत असणार आहे. ज्या संस्थेने, हॉटेलने थाळी 10 रुपयांना दिली, त्यांना 25 ते 40 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

जागा उपलब्ध होणार 

दुपारी 12 ते दोन वाजेपर्यंत या थाळीचा गरजूंना आस्वाद घेता येणार आहे. यावेळेत संबंधित हॉटेलमध्ये अशा गरजूंना वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शिवाय बाहेरचे जेवण संबंधित ठिकाणी घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. तसेच शिळे अन्न दिले जाणार नाही, याची काळजी संबंधित हॉटेलचालकांना घ्यावी लागणार आहे. शिवाय अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून घेणेही हॉटेलमालकावर बंधनकारक असणार आहे. 

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दोन ठिकाणी शिवभोजन थाळी विक्री केली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी 125 प्रमाणे एकूण दिवसात 250 थाळी देता येणार आहेत. यातून गरजूंनी लाभ घेणे अपेक्षित आहे.
- चारुशीला देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivBhojan Thali In Osmanabad Shivsena News