धक्कादायक : पत्नीचा जाळुन खून करणाऱ्या पतीवर गुन्हा, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घटना

राजेश दारव्हेकर
Friday, 22 January 2021

कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद घालून तुझा काटाच काढतो असे नेहमी म्हणत असे. 

हिंगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे एका विवाहितेला मारहाण करून तिच्या अंगावर ज्वलंतशिल पदार्थ टाकून तिचा जाळुन खून केल्याप्रकरणी पती विरुद्ध कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २२) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या पांगरा शिंदे येथे रामा मारकळ हा त्याची पत्नी संगीता मारकळ हिच्यासोबत लग्न झाले तेव्हापासून काही दिवसातच तिला तु दिसायला चांगली नाही, तुला स्वयंपाक येत नाही म्हणून शिविगाळ करुन त्रास देत असे. तसेच तु काम करीत नाही  म्हणून नेहमी टोचून बोलत असे. कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद घालून तुझा काटाच काढतो असे नेहमी म्हणत असे. 

हेही वाचा अबब...चोरीच्या 32 मोटारसायकल पाथरीतून जप्त

दरम्यान, गुरुवारी (ता. २१) कोणत्या तरी बहाण्याने रामा मारकळ याने पत्नी स़ंगीता हिला बोल्डा शिवारातील एका नाल्याच्या ठिकाणी घेऊन जाऊन तीला मारहाण करून जाळून तिचा खून केला. याबाबत नानाराव भुरके रा. झरा तालुका कळमनुरी यांनी शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात मयत संगीताचा पती नाना मारकळ याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास कुरुंदा पोलिस करीत आहेत. दरम्यान मयत संगीता हिला दोन मुली आहेत एक दोन वर्षाची तर एक दोन महिन्याची मुलगी आहे. मयत संगीतावर शुक्रवारी सकाळी पांगरा शिंदे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Crime against husband who burnt wife to death, incident at Pangra Shinde in Wasmat taluka hingoli news