मन हेलावणारी बदनापूरची घटना : विहीरीत पंप सोडताना वीजप्रवाह सुरू झाल्याने दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

आनंद इंदानी
Saturday, 21 November 2020

अवघ्या दोन दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे तिघा भावंडांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजीच असताना पुन्हा कुसळी येथे ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बदनापूर (जालना) : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युतपंप पाण्यात सोडताना विजप्रवाह सुरू झाल्याने दोघे तरुण आते-मामे भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.21) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कुसळी शिवारातील गट क्रमांक 93 मधील भाऊसाहेब वैद्य यांच्या शेतातील विहीर काठोकाठ भरली आहे. शेतात सध्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. त्यात विहिरीतील विद्युतपंप नादुरुस्त झाल्याने वीज पंपाच्या केबल जोडणीचे काम आतेभाऊ प्रदिप वैद्य (21) मामेभाऊ गणेश तार्डे (22) व हरिदास वैद्य करीत होते. तेव्हा विद्युत पंप विहिरीत सोडत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाला. त्यात प्रदिप वैद्य व गणेश तार्डे विहिरीतील पाण्यात पडल्याने बुडाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या घटनेची माहिती मिळताच, ग्रामस्थांनी तातडीने बदनापूर पोलिस आणि जालना येथील अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावले. जालना येथून पोलिस व अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांसह शोधकार्य शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होते. ही विहीर 70 फूट खोल असून पाणी उपसा करणेही अवघड असल्यामुळे दोघांचा शोध लावणे अवघड झाले आहे. दरम्यान, विहिरीतील पाण्यात बुडालेले गणेश तार्डे आणि प्रदिप वैद्य यांचे शोधकार्य जालना येथील अग्निशमन दल व बदनापूर पोलिसांच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विशेष म्हणजे गणेश कृष्णा तार्डे हा तरुण दिवाळीनिमित्त मामाच्या गावाला आलेला होता. ही विहिर जवळपास ८० फूट खोल असून सध्या ती काठोकाठ भरलेली आहे. विद्युत मोटार सुरू करताना अचानक पाईपमध्ये विजप्रवाह होऊन विजेचा झटका बसून ते पाण्यात फेकल्या गेल्यामुळे तोल जाऊन दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याचे कुसळी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

विहिरीतील पाण्यात गळ टाकून सदरील तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहूराव भिमाळे, पोलिस कर्मचारी संजय उदगिरकर, इब्राहिम शेख, वाहनचालक संग्राम ठाकूर आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाकुळणी येथील पानबुडी करणारे तरुण ऑक्सजिन सिलेंडर पाठीवर लावून विहिरीत शोध घेत आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking incident Badnapur two brothers die due to power outage while leaving pump well