esakal | बीडध्ये धक्कादायक : मावेजासाठी शेतकऱ्याने घेतले जाळून, आईनेही केला होता प्रयत्न   
sakal

बोलून बातमी शोधा

beed jal.jpg
  • आईने प्रयत्न केला होता; मुलाने जाळून घेतले आता तरी न्याय मिळेल का
  • बीडमधील पाटबंधारे कार्यालय आवारातील घटना
  • १५ वर्षांपासून पाठपुरा; शेतकरी ८० टक्के भाजला
  • आईनेही केला होता मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न

बीडध्ये धक्कादायक : मावेजासाठी शेतकऱ्याने घेतले जाळून, आईनेही केला होता प्रयत्न   

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : बिंदुसरा प्रकल्पालगत कर्मचारी वसाहतीसाठी तालुक्यातील पाली येथे संपादित केलेल्या जमिनीपैकी दहा गुंठे क्षेत्र कमी दाखविल्याने मावेजासाठी १५ वर्षांपासून कार्यालय आणि मंत्रालयात खेटे मारुनही न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याने अखेर पाटंबधारे कार्यालयाच्या आवारातच स्वत:ला जाळून घेतल्याची घटना मंगळवारी (ता. २४) शहरात घडली. अर्जुन कुंडलिक साळुंके (वय ३५, रा. पाली, ता. बीड) असे या शेतकऱ्याचे नाव असून या घटनेत सदर शेतकरी ८० टक्क्यांहून अधिक भाजला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या आई राधाबाई साळुंके यांनीही चार वर्षांपूर्वी मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यांना या प्रकरणी आंदोलनांमुळे चार वेळा अटक झाली होती. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


१९५६ साली तालुक्यातील पालीजवळ बिंदुसरा प्रकल्प उभारण्यात आला. त्यासाठी प्रकल्पालगतच कर्मचारी वसाहतीसाठी दोन हेक्टर सहा गुंठे जमीन पाटबंधारे विभागाने संपादित केली. यामध्ये अर्जुन साळुंके यांच्या आई राधाबाई कुंडलिक साळुंके यांच्या ३४ गुंठे जमिनीचा समावेश होता. तेंव्हा त्यांना ३४ गुंठ्याचा मावेजाही दिला होता. मात्र, त्यांच्या मूळ सातबारा उताऱ्यावर ३४ ऐवजी ४४ गुंठे जमीन संपादित केल्याची नोंद झाली. सदर बाब अनेक वर्षे साळुंके कुटुंबियांच्या निदर्शनास आली नाही. या दरम्यान राधाबाई यांचे पती कुंडलिक साळुंके यांचे निधन झाले. २००५ मध्ये संपादित क्षेत्रापेक्षा १० गुंठे जादा जमीन सातबारा नोंदीवरुन कमी झाल्याची बाब निदर्शनास आल्यावर राधाबाई व अर्जुन या मायलेकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला. मात्र, अद्यापही त्यांच्या सातबारा व फेरफारवर दुरुस्ती झाली नाही. संपादित क्षेत्रापेक्षा दहा गुंठे जादा सातबारा नोंदीवरुन कमी होऊनही त्याचा मावेजाही मिळाला नाही. पाटबंधारे, भूमिअभिलेख ते आयुक्त कार्यालयापर्यंत अर्जफाटे करुनही न्याय न मिळाल्याने अर्जुन साळुंके यांनी १३ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवून पाटबंधारे कार्यालयासमोर १६ ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याउपरही योग्य कार्यवाही न झाल्याने अखेर मंगळवारी अर्जुन साळुंके यांनी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा रुग्णालयासमोरील पाटबंधारे कार्यालयात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. सुरक्षारक्षकासह इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अंगावर पोते टाकून आग विझविली. यामध्ये त्यांचे संपूर्ण शरीर होरपळून निघाले आहे. त्यानंतर रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. अर्जुन साळुंके यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी तेथे धाव घेतली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आईचाही आत्मदहनाचा प्रयत्न; चार वेळा अटक

दरम्यान, त्यांच्या आई राधाबाई साळुंके यांनीही या प्रकरणी मोठा पाठपुरावा केला. त्यांनीही न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, त्याउपरही काही न झाल्याने २०१६ साली त्यांनी मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. न्यायासाठी त्यांनी केलेल्या विविध आंदोलनांमुळे त्यांना चार वेळा अटक झाली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अर्जुन साळुंके यालाही जाळूनच घ्यावे लागले.