कळंब : आठ जणांनी केली व्यापाऱ्यास बेदम मारहाण, सोनसाखळी हिसकावून पळाले  

दिलीप गंभीरे  
Thursday, 19 November 2020

जबरी दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून गळ्यातील सोन्याची साखळी पळवली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठेत मंगळवार (ता.१६) पहाटे घडलेल्या या घटनेने शहर हादरले असून या घटनेतील तीन आरोपीला पोलिसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केले आहे. उर्वरित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शर्यतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

कळंब (उस्मानाबाद) : जबरी दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून गळ्यातील सोन्याची साखळी पळवली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठेत मंगळवार (ता.१६) पहाटे घडलेल्या या घटनेने शहर हादरले असून या घटनेतील तीन आरोपीला पोलिसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केले आहे. उर्वरित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शर्यतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अजय हरकचंद कर्नावट यांचे शेती अवजारांचे दुकान आहे. दुकानाच्या फर्निचरचे काम चालू असल्याने १६ नोव्हेंबर रोजी व्यापारी कर्नावट दुकानाचे चॅनेल गेट लाऊन दुकानासमोर झोपले. मध्यरात्री एक ते सव्वाएक वाजण्याच्या सुमारास झोपेत असतानाच दरोडेखोर टोळीतील एकाने कपाळावर जोरात मारल्याने त्यांना जाग आली. त्यांनी डोळे उघडून पाहिले असता समोर सात ते आठ जण दिसले. त्या दरोडेखोरांनी कर्नावट यांना लोखंडी रॉडने पुन्हा मारहाण केली.
 त्यांच्या गळ्यातील दहा हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून घेतली व पुन्हा बीअरच्या बाटली डोक्यात मारुन व लाथा बुक्क्याने मारहाण केली. यावेळी कर्नावट यांनी आरडाओरड केल्याने वरच्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या मुलाने ओरडून खाली धाव घेतली. त्याचवेळी पोलिसांची पेट्रोलिंगची गाडी आली. त्यामुळे दरोडेखोरांनी तीन मोटारसायकल वरून पळ काढल्याचे कर्नावट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मारहाण करणारे २२ ते ३५ वयोगटातील होते. तसेच मराठी बोलत होते. दिवाळी पाडवा सण असल्यामुळे घरी सोने आणून ठेवले होते. त्याउद्देशाने दरोडेखोर आले असावेत असेही कर्नावट यांनी तक्रारीत म्हटले आहे. कर्नावट यांना पोलीस पेट्रोलिंग वाहनात उपचारासाठी कळंब उपजिल्हा रुग्णालयात व पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या मारहाणीत हात मोडला असून शरीरावर गंभीर मार लागला आहे. फिर्यादीवरून आठ अज्ञात दरोडेखोरांवर कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील, चेनसिग गुसिंगे करीत आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

धनंजय मुंडेकडे तक्रार केल्यावर गुन्हा दाखल 
कळंब पोलीस ठाण्यात अजय कर्नावट हे उपचार घेऊन आल्यानंतर फिर्याद देण्यासाठी गेले असता तेथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी तक्रार द्या असे सांगितले मात्र एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. कर्नावट यांच्या पत्नी किरण कर्नावट यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक तसेच सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक पाटील यांना आपबिती सांगितली. त्यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांना ही घटना व त्याचे गांभीर्य सांगितले. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली व मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केल्याचे कर्नावट यांनी सांगितले. किरण कर्नावट यांच्यावर एका आजाराबाबत उपचार चालू आहेत. तरीही पोलिसांनी फिर्याद दाखल करून न घेता आम्हा पती-पत्नींना ताटकळत ठेवल्याबद्दल पोलिसांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक श्री रोशन यांनी गुरुवार (ता.१८) घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

अवैध धंदे वाढले 
कळंब शहरात अवैध धंदे तसेच चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मागील आठवड्यात कथले चौक भागात तीन चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत दुकान फोडून शेतमाल लंपास केल्याची घटना मागच्या पंधरा दिवसांपूर्वी घडली असून वारंवार चोऱ्याच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking incident Kalamb trader was beaten eight people