Six lakh assistance to drought-stricken students
Six lakh assistance to drought-stricken students

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सहा लाखांची मदत 

औरंगाबाद - दरवर्षी मराठवाड्याला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. यंदा, मात्र ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्याचा परिणाम ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला. अतिवृष्टीमुळे कुटुंबाची परिस्थिती बिकट बनली. त्यामुळे शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कुटूंबाकडून येणारी आर्थिक मदत थांबली. या विद्यार्थ्यांची अडचण बेलापूर मुंबई येथील आमदार मंदा म्हात्रे यांना समजल्यानंतर त्यांनी बुधवारी (ता.20) विद्यापीठातील वसतीगृहात येवून तेथील तीनशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मदत दिली. यावेळी मीना खरे, बलबिरसिंग चौधरी, रविंद्र भगत, सत्यवान वर्मा, राजवंती वर्मा, किशोर शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतीगृहात मराठवाडा, विदर्भासह राज्यभरातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी राहतात. यंदा परतीच्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. विद्यापीठातील वसतीगृहात असलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना कुटूंबाकडून येणारी आर्थिक मदत बंद झाली. ही परिस्थिती भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना समजली. त्यांनी लगेच वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून वसतीगृहातील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे सहा लाखांची मदत दिली. 


आई वडीलांच्या कष्टाचे चिज करा 
यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्या, की परिस्थितीबाबत रडत बसण्यापेक्षा जिद्द, मेहनतीने अभ्यास करा. आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षणासाठी तुम्हाला पाठविले आहे, याची जाण ठेवा. विद्यार्थ्यांची अडचण कळल्यावर मदतीसाठी सामाजिक संस्थांना आवाहन केले. त्यामुळे ही मदत करता आली. सरकारी मदतीलाही मर्यादा आहेत. त्या समजून समाजातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी मदतीसाठी पुढे यायला हवे. 


नियोजन एकाचे, पैसे दुसऱ्याचे 
विद्यापीठातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला, परंतू त्या विद्यार्थ्यांनी आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करत असल्याचे सांगीतले. आमदार म्हात्रे यांनी आपण पक्षविरहीत मदत करत असल्याचे सांगितले. तेव्हा या विद्यार्थ्यांनी सर्व नियोजन करुन देतो, कोठेही राजकारण येणार नाही, असे सांगीतले. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी अमोल दांडगे, दीपक बहिर, दीक्षा पवार, प्रकाश गायकवाड, अंकुश शिंदे, विकास ठाले, बालाजी मुळिक, लक्ष्मण नवले, आनंद चौधरी, परमेश्वर काष्टे, पांडुरंग नखाते यांनी मदत देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com