चेंबरमध्ये गुदमरुन दोघांच्या मृत्यूप्रकरणी सहा वर्षांनी गुन्हा 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

चेंबरमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ता. २२ मे २०१४ रोजी घडली होती. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात संबंधित कंपनीचे अधिकारी व गुत्तेदाराविरुद्ध तब्बल सहा वर्षांनी सोमवारी (ता. २४) फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल

नांदेड : साफसफाईचे काम करण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ता. २२ मे २०१४ रोजी घडली होती. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात संबंधित कंपनीचे अधिकारी व गुत्तेदाराविरुद्ध तब्बल सहा वर्षांनी सोमवारी (ता. २४) फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
महापालिकेच्या हद्दीतील देगलूर नाका इदगाह मैदान कमानी समोर चेंबर दुरूस्तीचे काम सुरू होते. हे काम हैद्राबाद येथील केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीला दिले होते. या कंपनीसोबत महापालिकेचा करार झाला होता. परंतु या कंपनीने साफसफाई करणाऱ्या कामगारांना सुरक्षेसाठी कोणतीच सामुग्री पुरविली नव्हती. देगलूर येथे चेंबर दुरूस्तीचे काम सुरू असतांना कामगार हे चंबरमध्ये उतरून काम करीत असताना त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कंत्राटदाराने कुठलीच काळजी घेतली नव्हती. 

हेही वाचा - नंदी महाराज मंडळाचे अखंडीत सेवेचे व्रत : कशासाठी ते वाचाच

सुरक्षेअभावी कामगारांचा मृत्यू
 
त्यामुळे नाहक कामगारांना जीव गमवावा लागला. या चेंबरमध्ये पडून शेख युसुफ शेख खाजामिया (वय २४) रा. सिडको व मोहम्मद यासीन अब्दुल रज्जाक (वय २६) रा. लेबर कॉलनी या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. कंत्राटदाराच्या सांगण्यावरून हे दोन्ही कामगार साफसफाई करण्यासाठी चेंबरमध्ये उतरले असता त्यातच गुदमरून दोघांचाही मृत्यू झाला होता. 

केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी हैदराबादवर गुन्हा 

याप्रकरणी शेख खाजा मिया शेख गुलाम साब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित कंपनीने कामगारांना हेल्मेट, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क यासारखे सुरक्षेचे कोणतेही साहित्य पुरवठा न केल्याने कामगारांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूप्रकरणी केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी हैदराबादच्या संबंधित अधिकारी व गुत्तेदाराविरुद्ध मरणास कारणीभूत व कलम मानवी सफाई कामगार प्रतिबंध कायद्यान्वये इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अरूण नागरे करत आहेत.

येथे क्लिक कराइथे झाली ३६ कॉपीबहादरांवर कारवाई

आणखी एका मुलीचा विनयभंग

नांदेड : जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार काही थांबता थांबत नसल्याचे दिसून येते. अनेक गुन्ह्यातील आरोपी मोकाट असताना हदगाव तालुक्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना पुढे आली आहे.

११ वर्षीय बालिका ही मंदिरातून घराकडे जात असताना कैलास शिंदे या युवकाने पिडीत मुलीला पेप्सी देण्याचे कारण पुढे करत तिचा हात धरुन तिला फरफटत नेले. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मनाठा पोलिसांनी तरुणाविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मंदिरात देवासमोर दिवा जाळून सुखी जीवनाची आराधना करण्यासाठी गेलेल्या बालिकेची सुरक्षाही देवाच्या हाती राहिली नसल्याने मुलींचे रक्षण कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six years after the death in the chamber nanded news.