esakal | ...तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ... कोण म्हणाले वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

सेनगाव येथील जिल्हा मध्येवर्ती बँकेत दलालांकडून निराधार लाभार्थींची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी शाखेस भेट देवून कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले.  

...तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ... कोण म्हणाले वाचा

sakal_logo
By
जगन्नाथ पुरी

सेनगाव(जि. हिंगोली): लॉकडाउन काळात गोरगरीब, निराधार, गरजूंना मदतीसाठी नागरिक पुढे येत आहेत. तर दुसरीकडे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दलाल आपत्कालीन परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अनुदान काढून देण्यासाठी निराधार लाभार्थींची चक्क आर्थिक पिळवणूक होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी बुधवारी (ता. सहा) कर्मचाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या शाखेत दहा हजार खातेदार आहेत. शासनाकडून निराधार, वृद्ध, दिव्यांग लाभार्थींना विविध कल्याणकारी योजनेचे मासिक अनुदान दिले जाते. लाभार्थींना येथे येऊन स्वतः अनुदान नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. 

हेही वाचापुन्हा जमिनीतून गूढ आवाज...कुठे वाचा

पैसे काढून देण्याच्या नावाखाली लूट

गावनिहाय लाभार्थींना अनुदान वाटप होते. मात्र, मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील काही दलालांनी विड्रॉलवर लाभार्थींच्या स्वाक्षऱ्या आणून घरपोच पैसे नेऊन देण्याचा प्रकार सुरू केला आहे. संबंधित दलाल लाभार्थींना बँकेतून पैसे काढून देण्याच्या नावाखाली निराधारांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. बँकेतील काही कर्मचारी दलालांचे काम विलंब न लावता मार्गी लावतात.

संदेश देशमुख यांची शाखेला भेट 

 तर उपस्थित राहणाऱ्या लाभार्थींना ताटकळत बसावे लागते. दलालांकडून लाभार्थींच्या होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्याकडे आल्या. याची गांभीर्याने दखल घेत बुधवारी (ता. सहा) त्यांनी शाखेला भेट दिली. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत गरजू व निराधार व्यक्तींना सर्व स्तरांतील दानशूर व्यक्ती मदत करत आहेत.

शिवसेना स्टाईलने उत्तर

 मात्र, या बँकेत दलालांकडून निराधार लाभार्थींची आर्थिक पिळवणूक केली जाते. यापुढे तक्रार आल्यास कुणाचीच गय केली जाणार नाही, असे खडेबोल बॅंकेतील कर्मचाऱ्यांना श्री. देशमुख यांनी सुनावले. तसेच दलालांचा तत्काळ बंदोबस्त करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला.

येथे क्लिक कराहिंगोली @ ९१ : रिसाला बाजार परिसराच्या तीन किमीपर्यंत प्रवेश बंदी

शाखेने कारवाई करावी

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील विविध कल्याणकारी योजनेच्या खातेदारांना प्रत्यक्ष अनुदान वाटप करावे ही प्रमुख भूमिका बँक प्रशासनाला सांगितली. दलालांकडून लाभार्थींची आर्थिक पिळवणुकीचा प्रकार होत असल्यास शाखेने कारवाई करावी. या पुढे तक्रारी आल्या तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.
-संदेश देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख


कारवाई केली जाईल

येथील शाखेतून शाखेचा शिक्का असलेला विड्रॉल स्वीकारला जाणार, हा नियम आजपासूनच लागू केला आहे. प्रत्यक्ष लाभार्थी व खातेदारांना रक्कम दिली जाणार आहे. लाभार्थींनी रक्कम स्वतः काढून घ्यावी. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. कर्मचाऱ्यांकडून चुकीचा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- श्री. परिसकर, शाखा व्यवस्थापक