esakal | चौदा गावांच्या शेतीपंपांना दिवसा सौरवीज 
sakal

बोलून बातमी शोधा

सौर वीज.jpg

मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतून वीजपुरवठा सुरू 

चौदा गावांच्या शेतीपंपांना दिवसा सौरवीज 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा आणि शाश्वत वीज पुरवठा देण्यासाठी मागील युती सरकारने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरू केली होती. या योजनेतून महात्मा गांधी जयंतीपासून (ता. दोन) निलंगा तालुक्यातील १४ गावांतील दीड हजारहून अधिक शेतीपंपांना वीजपुरवठा सुरू झाला आहे. या योजनेतून दिवसा आठ ते दहा तास अखंडित वीज पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप भोळे यांनी दिली.
 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शेतीपंप अर्थात कृषीपंपांना अखंडित वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यात विजेच्या भारनियमनामुळे रात्रीच्या वेळीही शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीज पुरवठा अखंडित होत नाही. शेतीपंपासाठी लागणाऱ्या विजेची समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी युती सरकारने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना हाती घेतली होती. या योजनेत सरकारी जागेवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची उभारणी करून त्यातून शेतकऱ्यांना कमी दरात वीज पुरवठा करण्यात येणार होता. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निलंगा तालुक्यातील अनसरवाडा व पानचिंचोली वीज उपकेंद्रासाठी ही योजना राबवण्यात आली. योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले. यातूनच शुक्रवारी योजनेतून वीज पुरवठ्याला सुरवात झाल्याचे श्री. भोळे यांनी सांगितले. अनसरवाडा वीज उपकेंद्रातील कृषी वाहिनीतून चार गाव शिवारात ५१६ शेतीपंपांना तर पानचिंचोली उपकेंद्रातून पानचिंचोली, गौर व तुपडी अशा तीन कृषी वाहिन्यांतून दहा गावांच्या शिवारातील एक हजार शंभर शेतीपंपांना सौर वीज पुरवठा सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना आता अखंडित वीज उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात आणखी काही भागात योजनेतून वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तरच योजना सुरू राहणार 
योजनेतून एक रुपये ६० पैसे युनिट दराने शेतीपंपांना वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र, ही योजना सुरू ठेवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर आहे. सध्या पाच वाहिन्यांतून शेतीपंपांना वीज पुरवठा सुरू झाला तरी या वाहिन्यांवरून सौर वीज घेतलेल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी नियमित वीजबिल भरले तरच योजना पुढे सुरू राहणार आहे. या अटीचे पालन न केल्यास योजनेतून सुरू असलेला सौर वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

(संपादन-प्रताप अवचार)