
सागर मेहनती विद्यार्थी होता. त्याच्या बोलण्यात देशाभिमान, प्रेम असायचे. सुटीवर आल्यावर तो तरुणांना देशसेवेचे धडे द्यायचा.
परंडा (जि.उस्मानाबाद) : पंजाबमधील पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना रविवारी (ता.१४) झालेल्या वाहन अपघातात सोनारी (ता. परंडा) येथील जवान सागर पद्माकर तोडकरी (वय ३०) यांचा मृत्यू झाला. देशसेवेची आवड असलेले सागर हे भारतीय सैन्यदलाच्या १५ बटालियनमध्ये कार्यरत होते. पंजाबमधील पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास वाहनास अपघात झाला. त्यात सागर हे जखमी झाले होते.
त्यांना पठाणकोठमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
सागर मेहनती विद्यार्थी होता. त्याच्या बोलण्यात देशाभिमान, प्रेम असायचे. सुटीवर आल्यावर तो तरुणांना देशसेवेचे धडे द्यायचा. आमच्या कॉलेजचा विद्यार्थी असल्याबद्दल अभिमान वाटायचा. त्याचे अचानक जाणे काळजाला चटका लावणारे आहे.
प्रा. शंकर अंकुश, रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा.सागर हा चांगला मित्र होता. गावातील प्रत्येक कार्यात त्याचा सहभाग असायचा. सुटीवर गावी आल्यावर सगळ्यांशी तो आपुलकीने, आदराने वागायचा. देशसेवा करताना त्याला वीरमरण आल्याचे कळताच दुःख झाले. एक शूर मित्र गमावल्याची सल कायम मनात राहील.
- अमर गाढवे, सोनारी, ता. परंडा.
संपादन - गणेश पिटेकर