
बायकोला नांदायला न पाठवल्याने जावयानेच केला सासूचा खून
केज (बीड): तालुक्यातील साळेगाव येथे एका महिलेचा राज्य रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली होती. मात्र हा खून कोणी व का केला? हे स्पष्ट झाले नव्हते. पोलिस तपासात काही तासातच खुनाचे कारण स्पष्ट झाले असून, जावयानेच बायकोला नांदायला का पाठवत नाही? याकारणाने एका साथीदाराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करत सासूचा खून केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यातील सह आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील घायगुडा पिंपळा येथील लोचना माणिक धायगुडे व त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे साळेगाव येथे रविवारी (ता.२५) सकाळी सुलोचना यांचा जावई अमोल वैजनाथ इंगळे यांना काही कारणास्तव भेटण्यासाठी दुचाकीवर आले होते. भेटून ते अंबाजोगाईला परत जात असताना केज-कळंब राज्य रस्त्यावरील एका हॉटेलसमोर जावई व सासू यांच्यात वाद होऊन बाचाबाची झाली. त्यातच अमोल इंगळे याने चुलत मेव्हण्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लोचना धायगुडे यांच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातावर धारदार शस्त्राचे वार करून जखमी केले होते. यामध्ये सुलोचना यांचा मृत्यू झाला व पुतण्याही जखमी झाला होता.
हेही वाचा: धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत, साहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, अशोक नामदास, कादरी, अमोल गायकवाड, मंगेश भोले, दिलीप गित्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. यामध्ये पत्नीला बाळंतपणासाठी माहेरी जाऊन बरेच दिवस झाले तरी तिला नांदायला पाठवत नसल्याच्या राग मनात धरून अमोल वैजनाथ इंगळे याने प्रशांत बबन इंगळे याच्या मदतीने सासू व चुलत मेव्हण्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.
हेही वाचा: वृद्धत्व, बायपास झालेले असतानाही दाम्पत्याची कोरोनावर यशस्वी मात
यामध्ये अंकुश धायगुडे हा जखमी झाला तर सासू लोचना धायगुडे यांचा जागीच मृत्यू होता. पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रशांत इंगळे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र यातील मुख्य आरोपी अमोल इंगळे हा अद्याप फरार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे हे करत आहेत.
Web Title: Son In Law Killed His Mother In Law For Not Sending His Wife Beed Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..