काय हे, मुलाने केली घरातच चोरी 

उमेश वाघमारे 
Friday, 26 June 2020

सुंदरनगर भागात गुरुवारी (ता.२५) सकाळी एका चोरट्याने घरातील मोबाईल आणि चांदीची चेन लंपास केली, त्यातच सोन्याच्या दागिन्यांचा डबाही दडविला. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर तपासात घरचाच चोर निघाला.

जालना (जि.जालना) - सुंदरनगर भागात गुरुवारी (ता.२५) सकाळी एका चोरट्याने घरातील मोबाईल आणि चांदीची चेन लंपास केली, त्यातच सोन्याच्या दागिन्यांचा डबाही दडविला. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर तपासात घरचाच चोर निघाला.

जालना शहरात चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर येथील एका महिलेच्या घरातील एक मोबाईल, चांदीची चेन चोरट्याने गुरुवारी सकाळी लंपास केली होती. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल

या प्रकरणाचा तपास करीत असताना चंदनझिरा पोलिसांना ही चोरी फिर्यादी महिलेच्या मुलाने केली असून, चोरीचा माल विक्रीसाठी तो ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीच्या मुलाला शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता, आईचे व त्याचे पटत नसल्याने तो घरी राहत नव्हता अशी माहिती पुढे आली. त्यानंतर त्याने गुरुवारी सकाळी आई अंघोळीला गेल्यानंतर घरात प्रवेश केला. कपाटामधील सोन्याच्या दागिन्यांचा डबा व चांदीची चेन व मोबाईल फोनही चोरले; मात्र सोन्याच्या दागिन्यांचा डबा मोठा असल्याने त्याने तो पाण्याच्या टाकीखाली लपवून ठेवला व चांदीची चेन व मोबाईल घेऊन गेला, अशी कबुली पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल व चांदीची चेन असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : जुईत पाऊस थुईथुई... 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, रमेश चव्हाण, कर्मचारी अनिल काळे, चंद्रकांत माळी, अजय फोके यांनी ही कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son stole in house