घरी आणण्यासाठी गेले अन् स्वतःच अडकले

कृष्णा पिंगळे
Wednesday, 8 April 2020

सोनपेठ (जि. परभणी) पोलिसांनी पकडून त्यांच्या विरुद्ध संचारबंदी भंगाची कारवाई 

सोनपेठ (जि. परभणी)  : नगर जिल्ह्यातून पायी येणाऱ्या नातेवाइकांना घरी  आणण्यासाठी जाणाऱ्या दोघा जणांना सोनपेठ पोलिसांनी पकडून त्यांच्या विरुद्ध संचारबंदी भंगाची कारवाई केली. 

नांदेड जिल्ह्यातील काही मजूर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मंदिराच्या शिखरांची कामे करण्यास गेले होते. कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे तेथील कामे बंद झाली. तसेच सर्वत्र वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्या कामावर असणाऱ्या मजुरांची उपासमार सुरू झाल्याने व गावी परतण्यास कुठलीही सुविधा नसल्यामुळे व्यंकट डुकरे, भय्यासाहेब व्यवहारे व हनुमंत टापरे हे सर्वजण कंधार तालुक्यातील बोरी येथील रहिवाशी असून पायीच कंधार (जि. नांदेड)कडे निघाले. 
चार दिवसांपासून चालत चालत ते मंगळवारी (ता.आठ) बीड जिल्ह्याच्या हद्दीत आले असता त्यांनी गावाकडील त्यांचे चुलत भाऊ वीरभद्र डुकरे यांना फोन लावून आम्ही आता खूप थकलो आहोत. आम्ही आता पायी चालू शकत नसून तुम्ही आम्हाला घेण्यासाठी तेलगाव (जि. बीड) येथे या, अशी आर्त विनवणी केली. त्यांच्या फोनवरून वीरभद्र डुकरे याने त्याच्या ओळखीच्या एका चालकाला आपले चुलत भाऊ व त्याचे साथीदार यांना घेऊन येण्यासाठी विनवणी केली. 

हेही वाचा - कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांशी  ऑनलाइन संवाद

‘ते’ दोघे अडकले रस्त्यात 
श्रीगोंदा येथून पायी निघालेल्या तिघाजणांना घेऊन येण्यासाठी निघालेले हे दोघे जण मंगळवारी (ता.आठ) पहाटे लवकरच कार घेऊन निघाले. रस्त्यात असलेल्या अनेक चेक पोस्ट त्यांनी कच्च्या रस्त्याने जाऊन चुकवल्या. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते सोनपेठ शहरालगत असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या हद्दीवर पोचले. बीड जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्याला जोडणारे सर्वच छोटे मोठे रस्ते दगड माती टाकून तसेच काही ठोकानी खोदून बंद केले आहेत. या बंद केलेल्या रस्त्याजवळ आल्यावर मात्र, ते दोघे जण अडकले. 

हेही वाचा - सोनपेठच्या मजुरांना तामिळनाडूत मदत

संचारबंदी भंग केल्याचा गुन्हा दाखल 
सोनपेठ येथील पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत गस्तीवर असतांना त्यांना तिथे एक अनोळखी कार दिसून आली. त्यांची चौकशी केली असता संचारबंदीच्या काळात विनापरवाना फिरत असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध संचारबंदी भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक मजूर हे शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आपल्या गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी या मजुरांच्या राहण्याच्या व जेवणाची सोय केली आहे. तरीही मजुरांना आपल्या गावाकडची ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. सदरील घटनेत पायी येणाऱ्या मजुरांना घरी आणण्यासाठी निघालेल्या दोन नातेवाइकांनी स्वतःच अडकून पडावे लागले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonepeth police action against breach of communication,parbhani news