सोनपेठ तालुक्यात शिक्षण विभागाने कसली कंबर 

कृष्णा पिंगळे 
Wednesday, 25 November 2020

सोनपेठ तालुक्यातील माध्यमिक शाळा (ता.दोन) डिसेंबरपासून सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली असून तालुक्यातील तीनशेपेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू केली. यामध्ये एक जण कोरोना बाधित निघाला. 

सोनपेठ ः तालुक्यातील माध्यमिक शाळा (ता.दोन) डिसेंबरपासून सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली असून आरोग्य विभागाच्या सहकार्याने तालुक्यातील तीनशेपेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. यामध्ये एक जण कोरोना बाधित निघाला. 

परभणी जिल्ह्यातील शाळा (ता.दोन) डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी निर्णय घेतल्यानंतर तालुक्यातील शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. गेल्या एक वर्षांपासून बंद असणाऱ्या शाळा आता काही प्रमाणात गजबजणार आहेत. पहिल्या टप्प्यात माध्यमिक विभागाच्या आठवी ते दहावी या तीन वर्गातील विद्यार्थी ज्ञानार्जन सुरू करतील अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून अभ्यासाला मुकावे लागले आहे. ऑनलाइनचा मोठा गवगवा झाला असला तरी इंटरनेट लाईट, मोबाईल यांच्या अभावामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांनी याकडे पाठच फिरवल्याचे दिसून आले. 

२६६ कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण 
प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू होणाऱ्या वर्गांसाठी शाळा व वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या करण्याचे काम गेल्या १९ तारखेपासून सुरू झाले. तालुक्यातील ३२८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यापैकी २६६ कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून यापैकी केवळ एकच जण बाधित असल्याचे उघड झाले. उर्वरित ६२ कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेण्याचे काम अद्याप चालूच आहे. 

हेही वाचा - पिंपळदरी हद्दीतील गुंडांची टोळी तीन जिल्ह्यातून हद्दपार, परभणीत निघाले आदेश

विद्यार्थ्यांच्या ही होणार चाचण्या 
दोन डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळांसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या सुरू आहेत. त्यासोबतच सर्वच विद्यार्थ्यांच्या देखील कोरोना चाचण्या होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले. 

हेही वाचा - वैद्यकीय महाविद्यालयासाठी पूर्वपाहणी पथक पाठविणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन : खा.राजीव सातव यांनी घेतली भेट

 
सोनपेठ आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ 
तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या कोरोना तपासणी दरम्यान बाधित निघालेल्या एकाबाबत स्थानिक आरोग्य विभाग अतिशय हलगर्जीपणा दाखवत असल्याची तक्रार संबधित रुग्णाने केली आहे. त्या बाधित रुग्णाला कुठलीही लक्षणे नसली तरीही ते पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल का करण्यात येत नाही? तसेच त्यांना घरीच राहा असा सल्ला दिला जात असून कुठल्याही प्रकारचे औषधे देखील उपलब्ध करून देण्यात येत नसल्याची माहिती संबधित रुग्णाने प्रस्तुत प्रतिनिधीला फोनवर दिली. सोनपेठ येथील आरोग्य विभाग हा अनेक बाधित रुग्णांच्या बाबतीत नेहमीच हलगर्जीपणा करत असल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sonpeth taluka, the education department has tightened the belt, Parbhani News