अतिवृष्टी होऊनही उस्मानाबाद जिल्ह्यातील ३४ प्रकल्पांत ५० टक्केच पाणीसाठा

सयाजी शेळके
Thursday, 29 October 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी होऊनही ३४ प्रकल्प ५० टक्के रिकामेच आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टी होऊनही ३४ प्रकल्प ५० टक्के रिकामेच आहेत. मात्र, अनेक वर्षांनंतर जिल्ह्यातील तब्बल १४५ प्रकल्प १०० टक्के भरल्याने जिल्ह्यासाठी समाधानाची बाब ठरली आहे. जिल्ह्यात एक मोठा, १७ मध्यम, २०५ लघू प्रकल्प आहेत. यातील १४५ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत तर २६ प्रकल्प ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहेत. दरम्यान, पाच-सहा वर्षांत जिल्ह्यात दुष्काळ होता. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे होते. अनेक वर्षे जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाला तोंड द्यावे लागले होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात ५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यंदा यामध्ये फारसा फरक होईल, अशी स्थिती नव्हती. मात्र १३ आणि १४ ऑक्टोबरला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नद्या, नाले ओसंडून वाहिले. काही ठिकाणी नदीने पात्रही सोडले. जमीन खरडून गेली. दोन दिवसांत होत्याचे नव्हते झाले. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओसंडून वाहिले. अनेक प्रकल्पातून पाणी सोडावे लागले. जिल्ह्याच्या इतिहासात अनेक वर्षांनंतर शंभरपेक्षा जास्त प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकमेव सीना-कोळेगाव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. १७ मध्यम प्रकल्पांपैकी कळंब तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्प सर्वांत कमी म्हणजे ३२ टक्के भरला आहे. तर खंडेश्वरी मध्यम प्रकल्पाला तडे गेल्याने प्रकल्पाचा सांडवा फोडून पाणी बाहेर सोडून द्यावे लागले. त्यामुळे या प्रकल्पात सध्या केवळ ४१ टक्केच पाणीसाठा आहे. तर साकत प्रकल्पही (परंडा) ७७ टक्के भरला आहे.

लघू प्रकल्पही भरले
जिल्ह्यातील कळंब, वाशी तसेच भूम तालुक्यात अपुरा पाऊस आहे. त्यामुळे या तालुक्यातील अनेक लघू प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. जिल्ह्यात २०५ लघु प्रकल्प आहेत. यातील ११ प्रकल्पांत केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. चार प्रकल्पांतील पाणीपातळी ज्योत्याखाली आहे. तर ३० प्रकल्प केवळ ५० टक्के भरले आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In spite Of Heavy Rain Only 50 Percent Water Stock In 34 Dams Osmanabad