अखेर भावी वकिलांनाही लेखी परीक्षेतून सूट!  

विकास गाढवे
Friday, 13 November 2020

२० नोव्हेंबरपासूनच्या लेखी परीक्षा रद्द; अंतिम वर्षानुसारच अन्य वर्षाच्या परीक्षा 

लातूर : कोरोनामुळे विविध अभ्यासक्रमाच्या केवळ अंतिम वर्षाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेत अन्य वर्षाच्या परीक्षेसाठी सरकारने सवलत दिली होती. मात्र, विधी अभ्यासक्रमासाठी ही सवलत न देता अन्य वर्षाच्या लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले होते. मात्र, हा निर्णय विद्यापीठाने रद्द केला असून, अन्य वर्षाच्या परीक्षाही अंतिम वर्षाप्रमाणे घेण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १२) घेतला आहे. त्यासाठी २० नोव्हेंबरपासून होणाऱ्या लेखी परीक्षा रद्द केल्या असून, नव्या स्वरुपातील परीक्षा महाविद्यालय पातळीवरच दोन डिसेंबरपासून घेण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यापीठाच्या या निर्णयानंतर अन्य वर्षात शिक्षण घेत असलेल्या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोनामुळे विविध पदवी अभ्यासक्रमाच्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेत सरकारने अन्य वर्षाच्या परीक्षा न घेता अंतर्गत गुणांवरून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय विधी अभ्यासक्रमाला लागू करण्यात आला नव्हता. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या पत्रानुसार विद्यापीठाने विधी विषयाच्या एलएलबी प्रथम व द्वितीय वर्ष, बीएसएल प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष तर एलएलएममच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना केवळ पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यासाठी २० नोव्हेंबरपासून परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले होते. दोन तासांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना एकूण प्रश्नांपैकी तीन प्रश्न सोडविण्याचे बंधन घालण्यात आले होते. तीन प्रश्नांना मिळणारे गुण त्या विषयाच्या एकूण गुणांपैकी रुपांत्तरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विधी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारीही करून घेतली होती. दरम्यान, विद्यापीठाच्या प्रचलित म्हणजे लेखी पद्धतीने परीक्षा घेण्याच्या या निर्णयाला विरोध होऊ लागला. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एक व अन्य वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा न्याय विद्यापीठाकडून दिल्याने विरोध वाढला. शेवटी विद्यापीठाने गुरुवारी लेखी परीक्षेचा निर्णय मागे घेत अंतिम वर्षाप्रमाणेच अन्य वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापूर्वी दिलेला लेखी परीक्षेचा निर्णय रद्द करीत नव्या स्वरुपातील परीक्षा २ ते १२ डिसेंबरदरम्यान घेण्याचे आदेश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एमसीक्यू पद्धतीने होणार परीक्षा 
अन्य वर्षासाठीची उन्हाळी २०२० परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरुपात ५० प्रश्नांची असणार आहे. त्यापैकी चाळीस प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असून, एका प्रश्नाला एक याप्रमाणे चाळीस गुणांची परीक्षा होणार आहे. एका तासाची परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने होणार असून विद्यार्थ्यांना चाळीसपैकी मिळणारे गुण हे त्या विषयात असलेल्या कमाल गुणांनुसार रुपांत्तरित होणार आहेत. या परीक्षेत नापास झालेल्या व गैरहजर विद्यार्थ्यांची पुन्हा अतिरिक्त परीक्षा होणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SRT University announces exemption from written test for law students