esakal | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार २९७ कोटी; मराठवाड्यासाठी सर्वाधिक निधी, दिवाळीनंतरच मिळणार मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकरी तसेच बाधितांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने सोमवारी (ता.नऊ) दोन हजार २९७ कोटी सहा लाख रूपयांची मदत मंजूर केली आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार २९७ कोटी; मराठवाड्यासाठी सर्वाधिक निधी, दिवाळीनंतरच मिळणार मदत

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकरी तसेच बाधितांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने सोमवारी (ता.नऊ) दोन हजार २९७ कोटी सहा लाख रूपयांची मदत मंजूर केली आहे. निवडणूक आयोगाने मदतीच्या वाटपासाठी हिरवा कंदील दाखवताच सरकारने हा निर्णय घेतला. यात सर्वाधिक एक हजार ३३६ कोटी ८९ लाखाचा निधी एकट्या मराठवाड्यासाठी देण्यात आला असला तरी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होण्याची शक्यता धुसरच आहे. सलग चार सुट्यांमुळे दिवाळीनंतरच शेतकऱ्यांना मदत मिळण्याची आशा आहे.
राज्यात अनेक वर्षानंतर यंदा चांगला पाऊस झाला. मात्र, पावसाने अनेक भागात नुकसान झाले.

राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच : चंद्रकांत पाटील

यात अतिवृष्टी व पुरामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सप्टेंबरच्या मध्यात व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील पावसाने दाणादाण उडवून दिली. यात पिकांसह जमिनी, घरे व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. काही भागात पुरामुळे व्यक्ती तसेच जनावरेही मृत्यूमुखी पडली. या सर्व नुकसानीची सरकारने पाहणी करून नुकसान भरपाई मंजूर केली आहे. नुकसान झालेल्या पिकांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) निकषानुसार मंजूर मदतीशिवाय जास्तीची मदत सरकारने मंजूर केली. यात एसडीआरएफच्या निकषानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी सहा हजार आठशे रूपये मदत असताना सरकारने हेक्टरी दहा हजार रूपये तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार रूपये मदत असताना सरकारने पंचेवीस हजार रूपये मंजूर केली.

याची घोषणा करून मदतीच्या वाटपाचे दिवाळीपूर्वी नियोजन करण्यात आले. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे मदतीच्या वाटपासाठी सरकारने भारत निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली. सोमवारी आयोगाने आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेऊन मदत वाटपासाठी परवानगी दिली. त्यानंतर लागलीच सरकारने पहिल्या टप्प्यातील दोन हजार २९७ कोटीचा निधी राज्यातील सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून दिल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर यांनी काढलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.

पिकांच्या नुकसानीसाठी सर्वाधिक निधी
पहिल्या टप्प्यात सरकाने पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सर्वाधिक निधी दिला आहे. यात जिरायती पिकांसाठी हेक्टरी दहा हजार रूपयाप्रमाणे एक हजार ४९२ कोटी तर बहुवार्षिक पिकांसाठी ६८९ कोटीचा निधी दिला आहे. मृत, जखमी व घरे उद्धवस्त होऊन संसारोपयोगी साहित्याच्या नुकसान भरपाईसाठी २६ कोटी, मृत जनावरांसाठी सव्वासात कोटी, घरांच्या पडझडीसाठी २४ कोटी, शेत जमिनीच्या नुकसानीसाठी ५६ कोटी तर मत्स्य व्यावसायिकांसाठी अकरा कोटींची भरपाई दिली आहे. भरपाईसाठी आणखी निधीची गरज असून तो टप्प्याटप्प्याने उपलब्ध होण्याची आशा प्रशासनाच्या सुत्रांनी व्यक्त केली.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची आशा मावळली! रब्बीची पेरणी अंधातरी

मराठवाड्यासाठी सर्वाधिक निधी
अतिवृष्टी व पुराचा फटका सर्वाधिक मराठवाड्याला बसला. यामुळे पहिल्या टप्प्यात सर्वाधिक एक हजार ३३६ कोटी ८९ लाखांचा निधी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी मंजूर झाला आहे. यात लातूर जिल्ह्यासाठी १२९ कोटी ५० लाख, उस्मानाबाद - १४८ कोटी ३८ लाख, बीड - १५४ कोटी, नांदेड - २८४ कोटी ५२ लाख, हिंगोली - ११५ कोटी २७ लाख, परभणी - ९० कोटी ५१ लाख, जालना - २७१ कोटी ६० लाख तर औरंगाबाद जिल्ह्यासाठी १४३ कोटी सात लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे.

संपादन - गणेश पिटेकर