तो सर्पमित्र, दुकानदार, चालक आणि पुन्हा विद्यार्थी 

योगेश बरिदे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

लहानवयातच घरची संपूर्ण जबाबदारी अंगावर आलेली, त्यामुळे शिक्षण अर्धवट सुटलेले. तो सर्पमित्र बनला, दुकानही चालविले, चालक म्हणूनही तो काम करतो आणि या वाटचालीत तो पुन्हा विद्यार्थी बनला आणि पहिल्या श्रेणीच उत्तीर्णही झाला.

परतूर (जि.जालना) -  घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम, बालपणीच पितृछत्र हरपलेले, लहानवयातच घरची संपूर्ण जबाबदारी अंगावर आलेली, त्यामुळे शिक्षण अर्धवट सुटलेले. तो सर्पमित्र बनला, दुकानही चालविले, चालक म्हणूनही तो काम करतो आणि या वाटचालीत तो पुन्हा विद्यार्थी बनला आणि पहिल्या श्रेणीच उत्तीर्णही झाला. परतूरचा अशोक आबासाहेब चिंचाणे याची ही कथा. 

जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील सुतार गल्लीत अशोक चिंचाणे (वय २४) हा राहतो. त्याचे वडील टपाल कार्यालयात पोस्टमन पदावर कार्यरत होते. घरची परिस्थिती जेमतेम. चिंचाने दांपत्याचा अशोक हा एकुलता मुलगा. त्यातच बालपणीच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला. वडिलांच्या पेन्शनवर सध्या या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून अशोकने गल्लीतच छोटेसे किराणा दुकान सुरू केले; परंतु कालांतराने ते बंद झाले. घरची जबाबदारी अंगावर. त्यात अशोक सर्पमित्रही बनला. कुठे साप, धामण आढळली की मदत करायची, कोणी पैसे दिले तर ते घ्यायचे. हे सारे करताना तो वाहन चालविणे शिकला. मग वाहनचालक म्हणून काम करीत कुटुंबाला हातभार लावण्यास सुरवात केली.

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

शिक्षण केवळ नववी नापास. त्यातच योगायोगाने लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयाच्या एका शिक्षकाकडे चालक म्हणून रुजू झाला. तेव्हा शिक्षण घेण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली. मग अभ्यास करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे शिक्षकाने त्यास परीक्षेला बसण्याबाबत तसेच अभ्यासासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली. वेळप्रसंगी त्याचा अभ्यासही घेतला. त्यामुळे मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेला तो बसला आणि ६० टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

आलेल्या अडचणींवर मात करत दहावी उत्तीर्ण झालेल्या अशोकला अजून शिकण्याची आणि वडिलांप्रमाणे पोस्ट खात्यात नोकरी करण्याची इच्छा आहे. 

शिक्षण घेण्यासाठीची अशोकची धडपड शैक्षणिक प्रवाहापासून दूर गेलेल्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याला शिक्षकाचे मार्गदर्शन मिळाले. त्याने वेळ मिळेल तसा अभ्यास केला. 
दहावीत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला, ही चांगली बाब आहे. 
- रामराव घुगे, शिक्षक, परतूर 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success in exam