esakal | उस्मानाबाद जिल्ह्यात ऊसाचे गाळप वाढले, पण उत्पन्न घटले
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Cane

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असले तरी उतारा मात्र घटल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ऊसाचे गाळप वाढले, पण उत्पन्न घटले

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असले तरी उतारा मात्र घटल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या स्थितीला सुध्दा नऊ टक्क्याच्या जवळपास हा उतारा पोचला असल्याने त्याचा चांगलाच फटका पुढील वर्षी शेतकऱ्यांना बसणार असल्याचे चित्र आहे. दीड ते दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये बारा साखर कारखान्यांनी १८ लाख ३६ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यातुन १६ लाख क्विंटल साखरेचे उत्पन्न मिळाल्याने ८.७३ टक्के एवढा सरासरी उतारा मिळाला आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले होते.

सलग दोन वर्ष चांगला पाऊस झाल्याने शेतकरी गेल्या वर्षी ऊस पिकाकडे वळला होता. यंदा तर त्यामध्ये अजुन मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यंदा गाळपासाठी जवळपास तीस हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे पिक उभे होते. त्यातील ऊस आता गाळप देखील होत आहे. पण गाळप होत असताना शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला आलेल्या उताऱ्यावरुन पुढील वर्षी दर मिळत असतो. मात्र यावेळी दोन महिने होऊनही पायाभूत उतारा देखील गाठला गेलेला नाही. अजूनही त्यापासुन जिल्हा सव्वा टक्के दुर आहे. दहा टक्के हा केंद्र सरकारने पायाभूत उतारा मानला आहे.

त्यानुसार रक्कम जाहीर केले जातो. यावेळी दहा टक्के उताऱ्याला दोन हजार ८५० इतका भाव मिळाला आहे. तर त्या पुढील प्रत्येक टक्क्याला २८५ रुपये मिळतात. जिल्ह्याचा आजवरचा उतारा पाहिला तर तो सरासरी साडेदहा टक्के असतो. पण यंदा त्यामध्ये कमालीची घट झाल्याचे दिसुन येत आहे. पहिल्या महिन्यात तर हा उतारा अवघा आठ टक्क्यांवरच होता. आता त्यामध्ये काहीशी वाढ झालेली असली तरी ही वाढ समाधानकारक नाही. हा उतारा अशा वेगाने वाढत राहिला तर त्यामध्ये फारसा फरक दिसुन येणार नाही. यामुळे जिल्ह्याचा सरासरी उतारा कमी येऊन पुढील वर्षी दरामध्ये मोठी घसरण होण्याची भिती आतापासुन व्यक्त होऊ लागली आहे.

त्यातही खासगी साखर कारखान्याचा उतारा अधिक कमी असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये एकुण बारा कारखाने आहेत. त्यातील चार सहकारी तर आठ खासगी आहेत. चार सहकारी कारखान्याचे गाळप पाच लाख ३४ हजार मेट्रिक टन इतके झाले असुन त्यातुन ४ लाख ९१ हजार साखरेचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजे सरासरी ९.२ टक्के एवढा उतारा मिळाला आहे. त्याच तुलनेत खासगी आठ कारखाने आहेत. त्यांनी १३ लाख मेट्रिक टनाचे गाळप केले. त्यातुन ११ लाख १० हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न मिळाले आहे. तर त्यातून ८.५४ टक्के इतका सरासरी उतारा मिळाल्याचे दिसुन येत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत हा उतारा असल्याने अजुनही त्यात वाढ होऊ शकेल असा विश्वास व्यक्त होत आहे. अजुन दोन महिने हंगाम सूरु राहिले अस अंदाज व्यक्त होत असुन त्यामध्ये किती उतारा वाढेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image