esakal | साखर कारखान्यांचे धुराडे पेटले, ऊसदर जाहीर करावा शेतकऱ्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Cane

उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. त्यात यंदा इथॉनॉल निर्मितीवर जास्तीचा भर आहे. असे असले तरी एकाही साखर कारखान्याने दर जाहीर केलेला नाही.

साखर कारखान्यांचे धुराडे पेटले, ऊसदर जाहीर करावा शेतकऱ्यांची मागणी

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. त्यात यंदा इथॉनॉल निर्मितीवर जास्तीचा भर आहे. असे असले तरी एकाही साखर कारखान्याने दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे ऊसदराकडे लागले आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षे दुष्काळाने ऊसाची कमतरता होती. त्यामुळे अनेक साखर कारखाने सुरू झाले नाहीत. परिणामी आर्थिक फटका सहन करावा लागला. यंदा मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच ऊसाचे क्षेत्रही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू होत आहेत. अनेक कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे. त्यामुळे यंदा ऊसाची धुराडे अनेक दिवस चालणार आहे. याशिवाय यंदा पुन्हा पाऊस झाल्याने पुढील वर्षीही ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असणार आहेत.

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दिलासा

बाहेरील कारखान्यांच्या हालचाली
लातूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी ऊस्मानाबाद जिल्ह्यात येऊन ऊस घेऊन जाण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा ऊसाच्या दरामध्ये स्पर्धा होऊ शकते. जिल्ह्यातील काही साखर कारखाने बंद पडले असले तरी बाहेरच्या जिल्ह्यात नवीन कारखाने सुरू झाल्याने शेतकरी ऊस कुठे द्यायचा, याचा विचारात आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी बॉयलर पेटविले असले तरी एकाही कारखान्याने अद्याप दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी बाहेरच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांशी संपर्क ठेवून आहेत. परजिल्ह्यात जास्तीचा दर मिळाला तर जिल्ह्यातील ऊसाचे गाळप बाहेरच्या जिल्ह्यात जास्तीचे होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने जास्तीचा दर देतील का? तोडणीपूर्वी दर निश्चित करतील का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली

दर का निश्चित नाही?
ऊस तोडणीसाठी मजुरांना आगाऊ रक्कम दिली जाते. त्याचा दरही तोडणीपूर्वीच निश्चित केलेला असतो. वाहतुकीचेही तसेच आहे. वाहनमालकांना आगाऊ रक्कम दिली जाते. मात्र शेकतऱ्यांना दर निश्चित करताना कारखाने आकडता हात का घेतात? साखर कारखान्यांनी किमान दर निश्चित करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर