साडेचारशे ऊसतोड मजूर परतले 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

जालना जिल्ह्यातील अनेक ऊसतोड मजूर हे परजिल्ह्यात साखर कारखान्याला ऊसतोडीसाठी गेले आहेत; मात्र, लॉकडाउनमुळे हे मजूर अडकून पडले होते; परंतु राज्य शासनाच्या निर्देशानंतर या मजुरांचा जिल्ह्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जालना - परजिल्ह्यात ऊसतोडीला गेलेले जिल्ह्यातील साडेचारशे ऊसतोड मजूर गुरुवारी (ता.२३) जिल्ह्यात परतले आहेत. त्यांची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात आली आहे. 

जालना जिल्ह्यातील अनेक ऊसतोड मजूर हे परजिल्ह्यात साखर कारखान्याला ऊसतोडीसाठी गेले आहेत; मात्र, लॉकडाउनमुळे हे मजूर अडकून पडले होते; परंतु राज्य शासनाच्या निर्देशानंतर या मजुरांचा जिल्ह्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा :  लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला मिळणार काम

त्यानुसार गुरुवारी (ता.२३) जिल्ह्यात ४४९ ऊसतोड मजूर परतले आहेत. यात बदनापूर तालुक्यात बीड जिल्ह्यातून ११, पुणे जिल्ह्यातून २५ असे ३९ ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. परतूर तालुक्यात सांगली जिल्ह्यातून ५१, कोल्हापूर जिल्ह्यातून ३७ असे ८८ ऊसतोड मजूर परतले आहेत. मंठा तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यातून ३६, औरंगाबाद जिल्ह्यातून नऊ, सातारा जिल्ह्यातून सहा असे ५१ ऊसतोड मजूर परतले आहेत.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

घनसावंगी तालुक्यात सातारा जिल्ह्यातून तीन तर कोल्हापूर जिल्ह्यातून नऊ असे १२ ऊसतोड मजूर परत आले आहेत. तर अंबड तालुक्यात सांगली जिल्ह्यातून १०९, पुणे जिल्ह्यातून १७, सातारा जिल्ह्यातून ६८, कोल्हापूर जिल्ह्यातून १६ तर सोलापूर जिल्ह्यातून ४९ असे २५९ ऊसतोड मजूर परत आले आहेत. दरम्यान, या मजुरांची आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष असणार आहे. 

गावाकडे परतू लागले  मजूर 

कुंभार पिंपळगाव -  राज्यात परतण्याचा राज्य शासनाने मार्ग मोकळा केल्यानंतर विविध ठिकाणी असलेले मजूर आता गावाकडे परतू लागले आहेत. गुरुवारी (ता.२३) विरेगव्हाण तांडा (ता.घनसावंगी) येथील काही मजूर गावाकडे आले. परिसरातून राज्याच्या विविध भागांत ऊसतोड करण्यासाठी अनेक मजूर जातात, तर काही मजूर जिल्ह्यातील कारखान्यांना जातात. जिल्हाअंतर्गत ऊस संपल्यानंतर मजूर बैलगाड्यानेच आपापल्या घरी परतले; मात्र इतर जिल्ह्यांत, राज्यात ऊसतोडीसाठी गेलेले मजूर मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमा ओलांडू शकले नव्हते. विविध कारखान्यांनी ऊसतोड मजुरांना कारखान्याचे गाळप संपल्यानंतर राहण्याची, खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसह जनावरांच्या चाऱ्याचीही व्यवस्था केली होती. मात्र मजुरांना घराची ओढ आणि कोरोनाची भीती यामुळे घर जवळ करण्यासाठी धडपड होती. दरम्यान, राज्य शासनाने ऊसतोड मजुरांच्या परतीचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर विविध कारखान्यांवर गेलेले मजूर आपापल्या गावी परलू लागले आहेत. दरवर्षी मजूर गावी परतल्यानंतर वाड्या, वस्त्यांवर गजबज दिसत होती, चार महिन्यांपासून भेटीगाठी नसल्यामुळे अनेक पाहुणे, नातेवाईक भेटीला येत होते, कारखान्याच्या गप्पा रंगत होत्या. यावर्षी मात्र मजुरांना गावात तोंड बांधूनच यावे लागले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane workers returned in Jalna district