नांदेडात बळीराजांच्या आत्महत्या सुरूच 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 29 मार्च 2020

एका शेतकऱ्याने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सुनेगाव (ता. लोहा) येथे गुरुवारी (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास घडली. 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तसेच मुलीच्या लग्न कसे करावे या तिहेरी संकटात सापडलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सुनेगाव (ता. लोहा) येथे गुरुवारी (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास घडली. 

संबंध देशात सध्या जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या महाभयंकर आजाराच्या सावटात असलेला शेतकरी व सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबेनात. लोहा तालुक्यातील सुनेगाव येथे शेतकरी आत्महत्येने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

हेही वाचापंजाब, हरियाणाचे तीन हजार शीख यात्रेकरू नांदेडात अडकले

नापिकी, कर्ज आणि मुलीचे लग्न या तिहेरी संकटात
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनेगाव (ता. लोहा) येथील शेतकरी कोंडिबा सुर्यभान जाधव (वय ३५) यांच्या शेतात मागील काही दिवसांपासून सतत नापिकी होत होती. त्यातून ते कतर्जबाजारी झाले होते. तसेच मुलीचे लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसल्याने लग्न कसे करायचे या तिहेरी संकटात अडकलेला हा शेतकरी हतबल झाला. त्याने आपल्या घरात साडीने पत्र्याच्या लाकडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी लोहा पोलिसांना कळविले. 

लोहा पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद

लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह खाली उतरुन उत्तरीय तपासणी करण्यासाठी लोहा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला. अंकुश भिमराव पवार यांच्या माहितीवरुन लोहा पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गुलाब राठोड करत आहेत. 

येथे क्लिक करा - हात जोडतो, घोडचूक करू नका : आमदार धीरज देशमुख यांचे आवाहन

सव्वापाच हजाराची दारु जप्त 

नांदेड : शहराच्या पावडेवाडी शिवारातील स्वराज बारसमोर एका झाडाखाली विनापरवानगी विदेशी दारु विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सव्वापाच हजाराची दारु जप्त केली. त्याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

मरळक (त. नांदेड) रोडवर पावडेवाडी शिवारात स्वराज हॉटेलजवळ दारु विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस नाईक सखाराम नवघरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी कारवाई केली. पोलिसांनी दारु विक्री करणाऱ्या युवकास विदेशी दारुसह अटक केली. ही कारवाई रविवारी (ता. २२) दुपारी तीन वाजता केली. सखाराम नवघरे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक बी. जी. बंडेवार करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide fermers continue in Nanded dist.