
सणांच्या काळात बाजारपेठेला नको सुटी
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याचे चित्र आहे. शिवाय बाजारपेठदेखील संध्याकाळी सातपर्यंत सुरू राहिल्याने निश्चितपणे त्याचाही व्यवसायावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.अगदी रुग्णांची संख्या वाढत असतानाही जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हाधिकारी यांनी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला नव्हता. आता सणासुदीचे दिवस जवळ आल्याने जिल्हा प्रशासनाने रविवारीसुद्धा बाजारपेठ सुरू ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यासह नागरिकांतून होत आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
सध्या जिल्ह्यामध्ये रविवारी जनता संचारबंदीचा अवलंब केला जात आहे. रविवारी दुकाने व सर्व व्यवहार बंद राहिल्याने त्याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. परिस्थिती सामान्य होऊ लागल्याने प्रशासनाने आठवड्यातील एक दिवसाची घोषित केलेली जनसंचारबंदी आता उठविण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. रविवार हा सुटीचा दिवस असतो. त्याच दिवशी खरेदीचे नियोजन करण्याची पद्धत आहे. त्याचा विचार करता कोरोनाच्या काळात लॉकडाउनमध्ये ही पद्धत काहीशी लोप पावल्याचे दिसून आले होते.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यावेळी तशी परिस्थितीही नव्हती. घराबाहेर पडण्याचा धोका असल्याने नागरिकांनीही स्वतःहून नियमांचे पालन केल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासनाने पहिल्यांदा सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यातही रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांची बदली झाली नवे जिल्हाधिकारी रुजू झाले. त्यांनी आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात दुकाने पुन्हा पाचपर्यंत उघडे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला तर काही दिवसांनी परिस्थिती पाहून त्यांनी दुकानाची वेळ पुन्हा वाढविली. ती सातपर्यंत केल्याने त्याचा चांगला फायदा झाल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदीसाठी वाढेल वर्दळ
रविवारी असलेला जनता कर्फ्यू अजूनही सुरूच आहे. सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याशिवाय बाजारपेठेतील चित्र बदलणार नाही. याचा विचार करून आता रविवारीही दुकाने सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. व्यापारी महासंघाने रविवारी साप्ताहिक सुटीचा निर्णय घेतला असला तरी आता सणासुदीच्या काळामध्ये बाजापेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पूर्णवेळ चालू ठेवणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
(Edited By Pratap Awachar)