पोलिस ठाण्यातील गप्पागोष्टी पडल्या महागात, चार जण निलंबित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

पोलिस अधीक्षक श्री. पिंगळे यांनी अचानक गातेगाव पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी काही पोलिस ठाण्यात काम करण्याऐवजी गप्पागोष्टी करीत बसल्याचे आढऴून आले. त्यावेऴी अधीक्षकांनी चार कर्मचाऱ्यांना निलंबनाचे आदेश काढले. 

लातूर : जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा बसवण्यासोबतच जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न नूतन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सुरु केला आहे. यात त्यांनी गातेगाव पोलिस ठाण्याला अचानक भेट दिली. त्यावेळी तेथे महिला कक्षात गप्पागोष्टी करताना पोलिस त्यांच्या निदर्शनास आले. या चारही पोलिसांनी श्री. पिंगळे यांनी निलंबित केले आहे. श्री. पिंगळे यांची शिस्त पाहता पोलिस दलातच खळबळ उडाली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून गेल्या महिन्यात श्री. पिंगळे येथे रुजू झाले. त्यांना येऊन एक महिनाही झालेला नाही. आल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या विरोधात एक मोहीम उघडली आहे. मटका, जुगार, अवैध दारू अशा ठिकाणी सातत्याने छापे टाकले जात आहेत. एका मटका बुकीची त्यांनी केलेली चौकशी आजही जिल्हा पोलिस दलात चर्चेचा विषय आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी कामाला लावले आहे. इतकेच नव्हे तर विशेष पथकाच्या माध्यमातून छापे टाकणेही सुरु केले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तीन दिवसापूर्वी श्री. पिंगळे यांनी गातेगाव पोलिस ठाण्याला अचानक भेट दिली. त्यावेळी पोलिस हवालदार सुरेश जाधव, व्यंकटेश सिरसे, बाबूराव डाबकर, नागनाथ बोईनवाड हे चार पोलिस कर्मचारी महिला कक्षात गप्पागोष्टी व मनोरंजन करताना त्यांना दिसले. कोरोनाच्या संदर्भातील उपाय योजनेचा एक भाग असलेल्या मास्कही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. फिजिकल डिस्टन्सिंगचेही त्यांनी उल्लंघन केल्याचे दिसून आले. यावेळी श्री. पिंगळे यांनी या चारही पोलिस कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. एवढ्यावरच श्री. पिंगळे हे थांबले नाहीत. त्यांनी या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. गेल्या काही दिवसापासून काम चुकारपणा करणाऱ्या काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे श्री. पिंगळे यांच्या शिस्तीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकाऱ्यांत बदल्याची भिती 

पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी कामाला सुरवात केली आहे. त्यात पहिल्यांदा त्यांनी पोलिसांनी गणवेश घालण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत गणवेश न घालणारे पोलिसही गणवेशात दिसू लागले आहेत. कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. काम न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना आता पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली जाईल की काय अशी भीतीही वाटू लागली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superintendent of Police latur Pingale suspend four employees