राजस्थानच्या ३०० कामगारांना देगलूरच्या आयटीआयचा आधार : डॉ. विपीन

फोटो
फोटो

नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगनात असलेल्या ३०० कामगारांना तेथील सरकारने हाकलून लावेल. मात्र मानवतेच्या दृष्टीकोणातून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी त्यांना देगलूरच्या आयटीआयमध्ये राहण्यास सांगितले. त्यांची सर्व व्यवस्था जिल्हा प्रशासन करत आहे. तेलंगनाने हाकललेल्या कामगारांना नांदेडने आधार दिल्याने सर्वत्र जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे कौतुक होत आहे. 

व्यवसायानिमित्त तसेच पोटासाठी राजस्थानमधून तेलंगणात गेलेले जवळपास ३०० कामगार सिमा पार करित राजस्थानकडे जात असतानाच त्यांना अडवून महसूल प्रशासनाने या नागरिकांची व्यवस्था देगलूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मगर येथे भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच तेलंगणातील संबधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते.

त्यांची सोय देगलूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केली

राजस्थानमधील जयपूर, चित्तोड व नागोर जिल्ह्यातील जवळपास ३०० कामगार तेलंगणातील हैदराबाद, कडप्पा, कर्नुल येथून देगलूर मार्ग चालत जात असतानाच महसूल प्रशासनाने त्यांना अडवून त्यांची सोय देगलूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केली. विशेष म्हणजे आपल्या गावाकडे परतण्यासाठी ही मंडळी तेलंगणातून ट्रकव्दारे तेलंगणातील मदनूरपर्यंत आले होते. मात्र त्यांना पुढे जाण्यासाठी ट्रकमध्ये जाता येत नसल्याने राजस्थानचे नागरिक देगलूरात अडकून पडले. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी तात्काळ देगलूर गाठून राजस्थानच्या नागरिकांशी चर्चा केली. जोपर्यंत वरिष्ठांकडून त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासंदर्भात आदेश मिळणार नाहीत तोपर्यंत त्यांना देगलूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रहाण्याच्या सुचना देण्यात आल्या. 

जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी तेलंगनाच्या अधिकाऱ्यांना झापले

जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणातील तहसीलदार, पोलीस अधिकाऱ्यांना व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन राजस्थानचे एवढे नागरिक ट्रकमध्ये कसे येत आहेत. तुम्ही जाणिवपुर्वक आमच्या सिमेवर आणून सोडत आहात का असा प्रश्न विचारुन त्यांना चांगलेच फैलावर घेतले. यानंतर जर राजस्थान अथवा कोणत्याही राज्यातील नागरिक देगलूर येथे आले तर त्यांना तुमच्याकडेच पाठवून देणार असल्याचे सांगितले. राजस्थानमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था सक्करगा गावातील नागरिकांनी केली होती.
 
दानशुर व्यक्तीनी पुढे यावे

महसूल प्रशासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्टोअर रुम स्थापन केली असून दानशूर व्यक्तींनी या नागरिकांच्या जेवणासाठी धान्य द्यावे असे आवाहन स्थानिक महसूल प्रशासनाने केले आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री पाटील, वैद्यकिय अधिक्षक संभाजी पाटील, नायब तहसीलदार वसंत नरवाडे आदिंची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com