बीड जिल्ह्यात धोकादायक ठिकाणावरून आलेल्यांचे स्वॅब निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

  • १९ पैकी १७ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह 
  • मुंबईच्या ऑर्थर रोड भागातून आलेले तिघेही निगेटिव्ह 
  • एकाचा स्वॅब रिपीट पाठविणार 
  • पुणे, अहमदाबादहून आलेल्यांचे स्वॅबही तपासणीला 

बीड : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी व लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणी केल्याने जिल्हा आतापर्यंत कोरोनामुक्तच आहे. प्रशासनाचे चोख काम आणि नागरिकांच्या प्रतिसादातून हा आदर्श पॅटर्न उभा राहिला. मात्र, आता जिल्ह्यात रिस्की एरियातून लोकांचे प्रवेश सुरू झाले आहेत. मात्र, सध्यातरी नशिबाने यातील कोणी पॉझिटिव्ह आढळले नाही. 

मुंबईच्या ऑर्थर रोड भागातून आलेल्या चौघांपैकी तिघांचे स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकाचा स्वॅब पुन्हा पाठविला जाणार आहे. नव्याने पाठविल्या गेलेल्या स्वॅबमध्ये पुणे, अहमदाबाद आदी ठिकाणच्या लोकांच्या स्वॅबचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी घेतलेल्या १९ जणांच्या स्वॅबपैकी १७ अहवाल शुक्रवारी (ता. १५) प्राप्त झाले. सदर अहवाल निगेटिव्ह आढळले. कोरोना लॉकडाउनच्या पहिल्या दोन टप्प्यांपर्यंत जिल्ह्याच्या हद्दी सील होत्या.

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

संचारबंदी व लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू होती. नागरिकांचाही प्रतिसाद होता. त्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त राहिला. मात्र, आता मुंबई, पुणे, औरंगाबादसह परराज्यातून देखील लोक येत आहेत. मात्र, त्यांच्यातील काही लोकांच्या तपासणीचे अहवालदेखील निगेटिव्ह आल्याने हे जिल्ह्याचे नशीबच म्हणावे लागेल. दरम्यान, आता पुणे व अहमदाबाद येथून आलेल्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान    

रम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून ३८२ लोकांचे ३९६ स्वॅब तपासणीला पाठविले असून यातील ३९४ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, दोन स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. यात बीडच्या जिल्हा रुग्णालयातून सर्वाधिक ३०३ स्वॅब तर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून ७७ स्वॅब तपासणीला पाठविले. केजच्या उपजिल्हा रुग्णालयातून सात तर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयातून पाच स्वॅब तपासणीला पाठविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swab negative of those who came from dangerous places in Beed district