पिकाला पाणी द्यायला जाताना बायकोच कुंकू पुसून जायच का; रुमणे मोर्चात आक्रोश

सुषेन जाधव
Tuesday, 1 December 2020

दिवसा वीज देण्यासाठी स्वाभिमानीचा महावितरणवर रुमणे मोर्चा 

औरंगाबाद : रात्रीच्या वेळेस पिकाला पाणी द्यायला गेलेल्या औरंगाबादसह जालना, बीड जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांनी जीव गमावले, हे यानंतर चालू देणार नाही असा इशारा देत ‘पिकाला पाणी द्यायला जाताना शेतकऱ्यांनी बायकोचं कुंकू पुसून जायचं का?’ असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांनी महावितरणला केला. मंगळवारी (ता.१) स्वाभिमानीतर्फे महावितरणवर दिवसा वीज देण्यासह इतर मागण्यांविरोधात रुमणे मोर्चा काढण्यात आला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कृषी पंपाला दिवसा वीज न मिळाल्याने शेतकऱ्यांना रात्रीला वीज आल्यानंतर पिकांना पाणी देण्यास जावे लागते. मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे (ता.भोकरदन) येथे तीन सख्ख्या भावंडाचा रात्रीच्या वेळी गव्हाला पाणी देताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील दोन शेतकरी तरुण बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. तर पैठण तालुक्यातील आपेगाव येथील दोन तर नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना रात्री पिकाला पाणी देत असताना अचानकपणे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गमवावा लागल्याच निवदेनात नमूद करत पिकाला पाणी द्यायला गेलेला आमचा बाप भाऊ सकाळी जिवंत घरी येईल का? याची आम्हाला शाश्वती राहिलेली नसल्याचे पुजा मोरे यांनी म्हटले आहे.
 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आणखी किती शेतकऱ्यांचे जीव गेल्यावर सरकार शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाची वीज वितरीत करणार असे अनेक प्रश्न स्वाभिमानीने उपस्थित केले आहे. दिवसा वीज देण्याच्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्ताय, जिल्हाधिकारी कार्यालये, महावितरणच्या कार्यालयात दिल्यानंतर आठ दिवसाची मुदत देऊनही दखल न घेतल्याने मंगलवारी रुमणे मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे, कृष्णा साबळे, माऊली मुळे, आझम खान, संपत रोडगे, सुनील शिंदे, प्रकाश बोरसे, संतोष निकम, विजय वैद्य, अन्वर अली, पुराण सनसे, रवींद्र इंगळे, भगवान शिंदे, यादवराव कांबळे, यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

पोलिसांच्या मदतीने महावितरणचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, वरिष्ठ अधिकारी गिरी यांच्याशी आमच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. महावितरणने बिबट्याचा शेतकऱ्यांवर झालेल्या हल्‍ल्याच्या ठिकाणी ३ डिसेंबरपासून दिवसा वीज देण्याचे तसेच उर्वरित मराठवाड्यात आठ दिवसात दिवसा वीज देण्याचे कबुल केले आहे. महावितरणला यासाठी स्वाभिमानीने ८ दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे आंदोलन थांबलेले नाही. 

- पुजा मोरे, युवती प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani march on MSEDCL provide electricity during day