स्वाराती विद्यापीठाचा गलथान कारभार, प्रश्नपत्रिकेसाठी साडे तीन तास 'वेटींग'

प्रशांत शेटे
Friday, 16 October 2020

शुक्रवारी (ता.१६) एम. काॅमची परीक्षा सकाळी साडे अकरा वाजता होती. परंतू विद्यापीठाकडून प्रश्नपत्रीका उपलब्ध झाली नसल्यामुळे विदयार्थ्यांना प्रश्नपत्रीकेची वाट पाहत बसावे लागले.

चाकुर (लातूर) : स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून एम. कॉम व्दितीय वर्षाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रीका वेळेत मिळत नसल्यामुळे तब्बल साडेतीन तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ताटकळत थांबावे लागले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाच्या संसंर्गामुळे विद्यापीठाच्या परीक्षा घ्यायचा की नाही याबाबत अनेक दिवस चर्चा झाल्यानंतर अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. एम. काॅम व बी. एडच्या परीक्षेला गुरूवार (ता.१५) पासून घेतल्या जात आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही पर्यांय देण्यात आले आहेत. ऑफलाईनच्या माध्यमातून विद्यार्थी महाविद्यालयात येऊन परीक्षा देत आहेत. शुक्रवारी (ता.१६) एम. काॅमची परीक्षा सकाळी साडे अकरा वाजता होती. परंतू विद्यापीठाकडून प्रश्नपत्रीका उपलब्ध झाली नसल्यामुळे विदयार्थ्यांना प्रश्नपत्रीकेची वाट पाहत बसावे लागले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यापीठाकडून दुपारी तीन वाजता प्रश्नपत्रीका प्राचार्याकडे उपलब्ध झाल्यानंतर परीक्षेला सुरूवात झाली. तब्बल साडेतीन तास उशीरा परीक्षेला सुरूवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागले. पहिल्या दिवशीही अडीच तास उशीराने प्रश्नपत्रीका उपलब्ध झाली होती. बीएडच्या परीक्षेसाठीही वेळेत प्रश्नपत्रीका उपलब्ध झाल्या नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यापीठयाच्या परीक्षा विभागात पुणे येथील एका बाह्य यंत्रणेकडून प्रश्नपत्रीका तयार करण्याचे काम केले जाते. त्यांच्याकडून वेळेत प्रश्नपत्रीका मिळाल्या नसल्यामुळे परीक्षा केंद्राला प्रश्नपत्रीका पाठविण्यासाठी विलंब होत आहे. दुसऱ्या दिवशी कोणत्या विषयाच्या परीक्षा आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी  परीक्षा विभागाची आहे, परंतू त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या केंद्रावर ही परीक्षा होत असून पन्नास विद्यार्थ्यापैकी ३७ विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देत आहेत. हे विद्यार्थी खेड्यापाड्यातून सकाळी दहा वाजता परीक्षा केंद्रावर हजर झाले परंतू प्रश्नपत्रीका उपलब्ध झाली नसल्यामुळे त्यांना ताटकळत परीक्षा केंद्रावर उपाशीपोटी थांबावे लागले, यात विद्यार्थींनींची संख्या सर्वांधीक आहे. विद्यापीठाकडून वेळेत प्रश्नपत्रीका उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. 

एम. क़ॉम व्दितीय वर्षाच्या प्रश्नपत्रीकेत तांत्रीक अडचण आल्यामुळे  प्रश्नपत्रीका महाविद्यालयाकडे वेळेत पाठविता आल्या नाहीत. 
डाॅ. रवि सरवदे, संचालक, परीक्षा विभाग, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.

परीक्षा वेळेत होत नसल्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या असून परीक्षा विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे, यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कुलुगुरूकडे करणार आहे. 
अॅड. युवराज पाटील, सिनेट सदस्य स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ. 
 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swami Ramananda Tirtha university news three hours waiting for the question paper