निर्जंतुकीकरणसाठी तहसीलदारांनी उचलला फवारा 

जगन्नाथ पुरी
बुधवार, 25 मार्च 2020

नगरपंचायत कार्यालयासह शहरातील मुख्य रस्ते व शहरातील सतरा प्रभागांमधील रस्त्यांची निर्जंतुकीकरणासाठी शहरात फवारणी करण्यात येत आहे. या निर्जंतुकीकरण फवारणी प्रसंगी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी स्वतः आपले मुख्यालय असलेली तहसील कार्यालय इमारत निर्जंतुकीकरण करून घेतली.

सेनगाव (जि. हिंगोली) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न चालविले जात आहेत. त्यानुसार नगरपंचायतकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी, शासकीय, निमशासकीय कार्यालयात जंतनाशकाची फवारणी केली जात आहे. बुधवारी (ता.२५) चक्क तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी फवाऱ्याची नळी उचलत मुख्य कार्यालयात फवारणी केली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. प्रत्येक नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, वेळोवेळी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत, कान, नाक, तोंड यांना शक्यतो हाताचा स्पर्श करू नये, कुठल्याही व्यक्तीशी संभाषण अथवा व्यवहार करताना किमान एक मीटर अंतर ठेवावे, शिंकताना व खोकलताना हात रुमालाचा वापर करावा, केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्रत्येकांनी आपल्या घरामध्येच थांबावे, आदींचा अंमल करणे अतिशय सक्तीचे आहे.

हेही वाचा हिंगोलीकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे : पालकमंत्री वर्षा गायकवाड

शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी

शासनाकडून वेळोवेळी नागरिकांना मार्गदर्शन व सूचना देण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिकांना घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. परंतु, काळजी घेणे नक्कीच काळाची गरज आहे. आपल्या गावात कुणी व्यक्ती विदेशातून परराज्यातून अथवा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, तर मेट्रो शहरातून आले असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, किमान एक आठवडा कुटुंबातून व्यक्ती विलिनीकरण करावे, घरातील कुठल्याही वस्तुला स्पर्श करू नये, खबरदारी घ्यावी, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

निर्जंतुकीकरणासाठी शहरात फवारणी

या कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत सेनगाव नगरपंचायतकडून तालुक्याचे वर्दळीचे ठिकाण असलेले तहसील कार्यालय, राष्ट्रीयकृत बँक, पोलिस ठाणे, नगरपंचायत कार्यालयासह शहरातील मुख्य रस्ते व शहरातील सतरा प्रभागांमधील रस्त्यांची निर्जंतुकीकरणासाठी शहरात फवारणी करण्यात येत आहे. 

कर्मचाऱ्यांच्या उपस्थित  निर्जंतुकीकरण

या निर्जंतुकीकरण फवारणी प्रसंगी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी स्वतः आपले मुख्यालय असलेली तहसील कार्यालय इमारत निर्जंतुकीकरण करून घेतली. या वेळी मुख्याधिकारी शैलेश फडसे, नगराध्यक्ष संदीप बहिरे, नगरसेवक उमेश देशमुख, युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण महाजन, निखिल देशमुख, नगरपंचायत कर्मचारी आकाश देशमुख, सफाई कामगार बाळू सुतार, देविदास सुतार, विनोद कांबळे, आदी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

येथे क्लिक करा-  हिंगोली जिल्‍ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

 

नागरिकांनी संयम राखावा

संपूर्ण राज्यात शासनाकडून विविध कठोर निर्णयाचा अंमल करण्याचे निर्देश प्राप्त असून त्यामध्ये कलम १४४ व २१ दिवसांसाठी लॉक डाऊनचा समावेश आहे. याबाबत तालुक्यातील नागरिकांनी आपला व आपल्या कुटुंबीयांच्या जीवासाठी कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी संयम राखावा. तसेच दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करावी.
- जीवककुमार कांबळे, तहसीलदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tahsildar raised fountain for sterilization