
आमदार तानाजी सावंत महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहिले होते.
उस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार प्रा.तानाजी सावंत यांनी स्वतःच्या पक्षाच्या खासदार, आमदार व नगराध्यक्ष यांच्याचविरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले. प्रा.सावंत महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहिले होते. पण त्यांच्या भूमिकेवरून ते विरोधी पक्षाच्याच मानसिकतेत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रा.सावंत यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाच्या प्राधान्यक्रमात कळंब तालुक्यातील दुधाळवाडी व तुळजापुर तालुक्यातील रामदरा साठवण तलावापर्यंतच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. सरकारचा अभिनंदनाचा ठराव मांडण्याचा मुद्दा नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी मांडला. त्याला विरोध करीत खासदार व आमदार यांच्यामुळे हे काम झालेले नसल्याचा दावा यावेळी प्रा. सावंत यांनी केला. शिवाय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचाही या कामाशी सबंध नसल्याचे सावंत यांनी सांगितल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला.
दरम्यान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सावंत यांना त्यामध्ये तुमचेही नाव असल्याची आठवण करून दिली. तरीही सावंत हे ऐकायला तयार नसल्याचे चित्र होते. याशिवाय शिवसेनेची नगरपालिका असलेल्या उस्मानाबाद पालिकेच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही प्रा.सावंत यांनी केली. नगरपालिकेच्या कामामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. ज्या व्यक्तीला पक्षात प्रवेश देऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी प्रा.सावंत यांनी दिली त्यांच्याविरोधातच त्यांनी आज आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
आजची बैठक म्हणजे निव्वळ राजकीय करमणूक असल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ७५ लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या कारंजाच्या कामावरुनही बैठकीत गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले. युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी महाविकास आघाडी सरकारचा अभिनंदनाचा ठराव मांडला. जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदनाचा ठरवा मांडला. स्त्री रुग्णालयासाठी दोनशे खाटांच्या रुग्णालयाची मागणीही त्यांनी यावेळी केली.
पालकमंत्री नाराज
आजच्या बैठकीत नेत्यांच्या हेव्यादाव्यांवरून पालकमंत्री शंकरराव गडाख नाराज झाले. मागास असलेल्या जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत भूमिका घेण्याची क्षमता असताना येथे वेगळ्याच गोष्टीसाठी संघर्ष पाहायला मिळत आहे. विकासासाठी भूमिका घेण्याची गरज असून किमान या सभागृहामध्ये तरी राजकारण नको अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
Edited - Ganesh Pitekar