छडी घेऊन गुरुजी रस्त्यावर 

सुहास सदाव्रते 
Saturday, 18 July 2020

पोलिस, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी यासह आता शिक्षकही पोलिस ठाण्याअंतर्गत विविध भागात कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे कोणी रस्त्यावर थुंकल्यास, मास्क न घातल्यास हातावर छडी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जालना - कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शहरात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिस, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी यासह आता शिक्षकही पोलिस ठाण्याअंतर्गत विविध भागात कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे कोणी रस्त्यावर थुंकल्यास, मास्क न घातल्यास हातावर छडी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहरातील परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी २३८ शिक्षकांच्या सेवा अधिगृहीत केल्या आहेत. हे शिक्षक आता शहरातील सदर बाजार, तालुका जालना, कदीम जालना व चंदनझिरा पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस मित्र म्हणून परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहे.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जालना शहरातील औरंगाबाद चौफुली, अंबड चौफुली, राजूर चौफुली यासह विविध मार्गावर पोलिस मित्र शिक्षक तैनात करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी असलेल्या पथकात शिक्षक, पोलिस व होमगार्ड यांचे पथक आहे. शनिवारी ( ता.१८ ) शहरातील मोंढा परिसरातील राजूर चौफुली येथे चंदनझिरा पोलिस ठाणेअंतर्गत वाहनांची तपासणी करण्यात आली. मास्क नसेल तर पाचशे रुपये, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळला नसेल तर दोनशे शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारणी करण्यात येत आहे. सकाळी सात ते दुपारी एक व दुपारी एक ते रात्री सात अशा टप्प्यात शिक्षक तपासणी करीत आहेत.

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

राजूर चौफुली येथे पोलिस कर्मचारी नंदकिशोर टेकाळे, प्रा.ज्ञानेश्वर राक्षे, प्रा.एकनाथ जईद, पोलिस कर्मचारी नंदकिशोर मेखले, प्रा.शरद अक्कलवार, होम गार्ड रामेश्वर सुरासे, अमोल क्षीरसागर यांचे पथक आहे. 

भोकरदन व राजूर या मार्गावरील प्रवासी, नागरिक, वाहनचालकांची तपासणी या केंद्रावर करण्यात येत आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी मास्क लावला नसेल तर पाचशे रुपये दंड आकारणी करण्यात येत आहे. यासह वाहनांची तपासणी पथकातील शिक्षक, पोलिस हे करीत आहे, दररोज अनेक वाहनांची तपासणी होते,असे यांनी सांगितले आहे. 
- प्रा.दिगंबर दाते , 
पोलिस मित्र 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher on duty as police friend