
हिंगोली तालुक्यातून कयाधु नदीच्या पात्रातून रेती उपसा करून त्याची विक्री केली जाते. मात्र मागील काही दिवसांत रेती घाटांचे लिलाव झालेच नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी रेतीचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे.
हिंगोली : तालुक्यातील दुर्गधामणी येथील गायरान जमिनीवर वाळू तस्करांनी साठविलेली सुमारे ४० लाख रुपये किंमतीची ४०० ब्रास वाळू तहसील कार्यालयाच्या पथकाने सोमवारी (ता.१४) रात्री जप्त केली आहे. या कारवाईमुळे वाळु तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
हिंगोली तालुक्यातून कयाधु नदीच्या पात्रातून रेती उपसा करून त्याची विक्री केली जाते. मात्र मागील काही दिवसांत रेती घाटांचे लिलाव झालेच नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी रेतीचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त रेती वाहतुक करतात. यासाठी रेतीसाठा देखील केला जात आहे. दरम्यान, तालुक्यातील दुर्गधामणी शिवारात नदीच्या पात्राच्या जवळच गायरान जमीनीवर मोठ्या प्रमाणावर रेतीसाठा असल्याची माहिती तहसीलच्या पथकाला मिळाली होती.
त्यावरून प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पांडूरंग माचेवाड, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, मंडळ अधिकारी मनोहर खंदारे, खंडेराव पोटे, गजानन परिसकर, तलाठी हर्षवर्धन गवई, अशोक केंद्रेकर आदीच्या पथकाने सोमवारी रात्री उशीराने दुर्गधामणी परिसरात जाऊन पाहणी केली. या ठिकाणी गायरान जमीनीवर ४०० ब्रास रेतीसाठा आढळून आला.
हे ही वाचा : हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाची दमछाक
तहसीलदार श्री. माचेवाड यांनी तातडीने रेतीसाठा जप्त करून पाच टिप्परद्वारे रेतीसाठा तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून टाकण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार रेतीसाठा उचलण्याची कारवाई सुरु करण्यात आली असून पाच टिप्परद्वारे रेती तहसील कार्यालयाच्या परिसरातील मैदानावर आणली जात आहे. या रेतीची किंमत ४० लाख रुपये असल्याचे तहसीलदार श्री. माचेवाड यांनी सांगितले.
हे ही वाचा : परभणी जिल्ह्यात संभाव्य पॅनल प्रमुख स्थलांतरित मतदारांच्या शोधात
जिल्ह्यात अद्याप वाळू घाटाचा लिलाव झालेलाच नाही. यामुळे रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. तसेच नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी महसूल प्रशासनाची बैठक घेऊन अवैध वाळू साठा जप्त करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वसमत येथील तहसील कार्यालयातर्फे देखील अवैध वाळू वाहतूक व साठ्या बाबत तालुक्यातील परळी दशरथे येथून वाहणाऱ्या पुर्णा नदीच्या पात्रात १४१ ब्रास वाळू जप्त केली आहे. दरम्यान, कोरोना काळात याकडे दुर्लक्ष झाल्याने वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा करून त्याचे साठे केले आहेत.
हिंगोली तालुक्यामध्ये होत असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पथक तयार करण्यात आलेले असून, वाळू तस्करी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पथक कार्यतप्तर आहे.
- पांडुरंग माचेवाड (तहसीलदार)
संपादन - सुस्मिता वडतिले