
उस्मानाबाद जिल्हा परिषदेची बुधवारी (ता. नऊ) झालेली ऑनलाइन सर्वसाधारण सभा कोणाचा कोणाला ताळमेळ न लागल्याने चांगलीच चर्चेत आली आहे.
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेची बुधवारी (ता. नऊ) झालेली ऑनलाइन सर्वसाधारण सभा कोणाचा कोणाला ताळमेळ न लागल्याने चांगलीच चर्चेत आली आहे. `ना आवाज म्यूट, ना कोणी लक्षपूर्वक ऐकतोय, मध्येच हॉर्न वाजतोय, घरातील गलका ऐकू येतोय अशी परिस्थिती. या साऱ्या गोंधळातच केवळ कागदावरच सभा झाल्याचे चित्र आहे.कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी शासनाने काही निर्देश दिले आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या सर्वसाधारण सभा ऑनलाइनद्वारे घेण्याचे निर्देश असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे बुधवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. मात्र ही सभा केवळ कागदोपत्रीच झाली, कोणाला काहीच ताळमेळ लागला नाही, अशी भावना सदस्यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे जेव्हा मिटींग सुरू झाली. तेव्हा प्रत्येक सदस्याने आवाज म्यूट (बंद) करणे अपेक्षित असते. मात्र १० ते १५ सदस्यांनी आवाज म्यूट केलेलेच नव्हते.
काही सदस्य प्रवासात होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेतच गाड्यांच्या हॉर्नचा आवाज घुमत होता. तर वाहनांचाही आवाज मोठ्याने येत असल्याने अन्य इतर सदस्यांना पुरेसे ऐकायलाही येत नव्हते. सभेत काय सुरू आहे, याचे कोणालाच काही कळलेच नाही. तर काही सदस्य घरातच होते. त्यामुळे मुले आणि घरातील इतर सदस्यांनी जोरात बोललेला आवाजच सभेमध्ये गोंधळ वाढवीत होता. विशेष म्हणजे बहुतांश सदस्य ऐकत असताना मध्येच गोंधळ होत असल्याने जिज्ञासू वृत्तीने ऐकणाऱ्यांचाही चांगलाच हिरमोड होत होता.
विकास कामे दूरच
विकासाच्या मुद्द्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अपेक्षित असते. विशेष म्हणजे तीन महिन्यातून एकदा सर्वसाधारण सभा होते. त्यातही अशा गोंधळाच्या स्थितीत सभा झाल्याने सर्वसाधारण सभेपासून विकासाची कामे दूरच राहिल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू होती. विशेष म्हणजे जिल्ह्यात सध्या सर्वच आस्थापना सुरू झाल्या आहेत. शिवाय बिहार येथील निवडणूक, पदवीधरांची निवडणूक पार पडली असताना सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम येत होता. समोरील व्यक्ती, अधिकारी काय बोलते, हे काहीच कळत नव्हते. सोशल डिस्टन्सिंग पाळून सभा घेण्याची आम्ही मागणी केली होती. मात्र आमचे ऐकले नाही. विशेष म्हणजे अनेक सदस्यांना याबाबतचे तंत्रज्ञानच माहिती नाही. त्यामुळे ५४ पैकी जेमतेम ८ ते १० सदस्य सभेत बोलले असतील.
- संदीप मडके, सदस्य, जिल्हा परिषद.ऑनलाइन सभेत अचानकच आवाज येत होते. त्यामुळे विषय समजून घेण्यास वेळ लागत होता. पण, पुढील बैठक सोशल डिस्टन्सिंग पाळून घेण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत.
- धनंजय सावंत, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.
Edited - Ganesh Pitekar