साखर कारखान्यांच्या तांत्रिक दुरुस्तीला ब्रेक 

दिलीप पवार 
Thursday, 7 May 2020

 साखर उद्योगच संकटाच्या चक्रव्यूहामध्ये सापडला आहे. हंगाम समाप्तीवेळीच कोरोनाने थैमान घातले. आता लॉकडाउनमुळे सुटे भाग, तंत्रज्ञ, कुशल मजूर मिळत नसल्याने तांत्रिक दुरुस्तीलाही ब्रेक लागला आहे.

अंकुशनगर (जि.जालना) -  केंद्र आणि राज्य शासनाच्या महसुली उत्पन्नाचा आर्थिक कणा समजला जाणारा- शेतकरी, शेतमजूर आणि कामगार व ग्रामीण अर्थकारणाचा आधारस्तंभ असणारा साखर उद्योगच संकटाच्या चक्रव्यूहामध्ये सापडला आहे. हंगाम समाप्तीवेळीच कोरोनाने थैमान घातले. परिणामी हंगाम घाईगडबडीत उरकण्यात आला. आता आगामी हंगामासाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी लॉकडाउनमुळे सुटे भाग, तंत्रज्ञ, कुशल मजूर मिळत नाहीत, त्यामुळे तांत्रिक दुरुस्तीलाही ब्रेक लागला आहे. 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर मे महिना हा तांत्रिक दुरुस्तीचा काळ असतो. यात बॉयलरची देखभाल-दुरुस्ती, मशिनरींची कामे आदी होतात.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

बॉयलर फॅन्स, इतर ब्लोअर्स व रोटरी ईक्विपमेंट्‌स, सेंट्रिफ्युगल मशीन बास्केटचे बॅलन्सिंग करणे ही कामे बाहेर करावी लागतात. त्यासाठी कोल्हापूर, लातूर किंवा बारामती येथे पाठवून बॅलेन्सिंग करून आणावे लागतात. ते कारखाने उघडल्यावरच ही कामे होतील. यासोबतच बॉयलरची तपासणीची कामे, वजनकाटे दुरुस्ती आणि कॅलिब्रेशन, फ्लो मीटर्स कॅलिब्रेशन, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन आदी शासकीय नियमाप्रमाणे दरवर्षी करणे बंधनकारक आहेत.

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

बॉयलरची तपासणी करून करावयाची आवश्यक कामे; तसेच इतर सर्व मशिनरींचे सुटे भाग आणि देखभाल व दुरुस्तीविषयक कामे यांचे मागणीपत्र भरणे, त्यानंतर निविदा मागवणे, दरपत्रके घेणे, किमतीचे तुलनात्मक तक्ते तयार करणे, संबंधित समितीची बैठक घेणे व नंतरच कामाच्या ऑर्डर देणे या बाबी सहकारी साखर उद्योगाला बंधनकारक आहेत; मात्र सध्याच्या स्थितीत कारखान्यांची कामे ठप्प आहेत. 

साहित्य लवकर मिळण्याची नाही शाश्‍वती 

कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने हे साहित्य लवकर मिळेल, याची शाश्वती नाही. शिवाय साहित्य उशिरा मिळाले तर दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत याचीही भीती आहे. तसेच इलेक्ट्रिकल मोटर्स- पॅनेल बोर्डस्, पॉवर टर्बाईन आदी दुरुस्तीची, देखभाल करणारे तंत्रज्ञ, कामगार परराज्यातील, परजिल्ह्यातील आहेत. ही मंडळी दुरुस्ती कामासाठी पोहोचू शकत नाहीत. ही कामे वेळेवर झाली नाहीत तर ब्रेकडाउनचीही भीती निर्माण होत आहे. या सर्व बाबींचा गाळपावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

ऊस नोंदीचीही कामे थांबली

प्रत्यक्ष ऊस क्षेत्राची पाहणी करून सुरू व खोडवा ऊस नोंद करण्याच्या कामास सुरवात होते; परंतु सोशल डिस्टन्सिंगमुळे ही पाहणी करता येणार नसल्याने खुद्द शेतकऱ्यांना कारखान्यामध्ये जाऊन या नोंदी कळवाव्या लागणार आहेत. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या दोन्ही युनिटच्या कार्यक्षेत्रात पुढील हंगामात नोंद असलेला ऊस २१ हजार हेक्टर आहे. उशिरा ऊसलागवडीच्या नोंदी लॉकडाउनमुळे राहिल्या आहेत, त्या वाढण्याची शक्यता आहे. पुढील हंगामात २२ लाख टन ऊस राहणार असून २ लाख टन ऊस बेणे म्हणून जाईल. रोज साडेसहा हजार टन ऊस गाळप जरी केले तर दोन्ही कारखाने मिळून १३ लाख टन ऊस गाळप होईल व त्यातील राहिलेला ७ लाख टन ऊस हा बाहेरच्या कारखान्याला द्यावा लागेल, असे कार्यकारी संचालक दिलीप पाटील यांनी सांगितले. 

आर्थिक गणितही बिघडलेले 

आगामी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात ऊसउत्पादन होण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांकडे मोठ्याप्रमाणात साखर शिल्लक असल्याने कर्ज आणि व्याजाचे हप्ते अदा होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे बँकांनीही पूर्वहंगामी कर्जे वेळेत दिली नाहीत तर नवीन माल मिळणार नाही. चुना, सल्फर, पी.पी. बॅग, ऑईल हे साहित्य रोखीने खरेदी करावे लागते. त्यासाठी आर्थिक यंत्रणा सक्षम असणे क्रमप्राप्त आहे. बहुतांश कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार पाच ते बारा महिन्यांपर्यंत थकलेले आहेत. त्यामुळे मजूर आणि कामगारही अनुपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

लॉकडाउनमुळे यंदा कारखान्याच्या तांत्रिक दुरुस्तीला ब्रेक लागला आहे. कारखान्याचे मेंटेनन्स करण्यासाठी बाहेरील इंजिनिअर येत नसल्याने व दुरुस्ती न झाल्यास कारखाना सुरू होणे कठीण आहे. 
- दिलीप पाटील, कार्यकारी संचालक,  
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखाना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technical repairs of sugar factories stopped