ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो जाळला, पाटोदा तालूक्यात हिंसक वळण

सुधीर एकबोटे
Friday, 23 October 2020

या टेम्पोत कोयता येथील मुकादमाचे साडे सहा लाख रुपयाची रोकड होती. ती पूर्ण पणे जळून गेल्याचा आरोप मुकदमाकडून करण्यात आला आहे.

पाटोदा (बीड) : आपल्या विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात उसतोड मजूर, वाहतूकदार यांचे आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. काही दिवसांपूर्वीच आष्टी तालुक्यात उसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला जाळल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुपारी पुसद तालुक्यातील मजुरांना घेऊन जामखेडकडे छुप्या मार्गाने निघालेल्या टेम्पोला पाटोदा नजीक असलेल्या अनपटवाडी येथे अज्ञात लोकांनी अडवून मजुरांना धमकावून खाली उतरवले व चालकाला मारहाण करून टेम्पोला आग लावल्याची घटना घडली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या टेम्पोत कोयता मुकादमाचे साडे सहा लाख रुपयाची रोकड होती. ती पूर्ण पणे जळून गेल्याचा आरोप मुकदमाकडून करण्यात आला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसात आ. सुरेश धस यांनी उसतोड मजुरांना भाववाढ मिळावी या मागणीसाठी संपूर्ण राज्यात दौरा करत या विषयी तोडगा निघेपर्यंत मजुरांनी कोयता म्यान करावा अशी साद घातली होती. त्यांच्या भूमिकेला बहुतांश उसतोड संघटनांनी पाठींबा दिल्याने सध्या हा संप सुरु आहे. त्यामुळे संप सुरु असताना उसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून त्या परत पाठवल्या जात आहेत. मात्र आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जामखेड तालूक्यातील आपटी या गावचे मुकादम गोरे यांनी पुसद, वाशीम भागातील कोयत्याला वीस लाख रुपयांची उचल दिली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या मजुरांना शुक्रवारी त्यांच्या गावातून जामखेड तालुक्यात टेम्पो (क्र.एमएच ११ ए एल ३४२६) या गाडीतून जामखेड तालुक्यात आणले जात होते. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पाटोदा परिसरात हा टेम्पो आला असता अनपटवाडी परिसरात नेला व या टेम्पोतील चालकाला मारहाण करून टेम्पोला आग लावली. या गाडीत तब्बल २४ मजूर (महिलांसह) आणि ८ ते १० लहान मुलांचा समावेश होता. तर यात एक कोयता मुकादम करण शेळके यांच्या कडे असलेली सहा लाख रुपयाची रोकड गाडीतच राहिल्याने ही रोकड ही जळल्याची त्यांनी सांगितले. सदर टेम्पो जळल्याची घटना पाटोदा तालुका अनपटवाडी परिसरात घडली. मात्र हा भाग जामखेड तालुक्याच्या हद्दीत येत असल्याने जामखेड पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार देणार असल्याचे सबंधित मुकादमाने सांगितले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tempo burned carrying cane workers Patoda news