
थंडीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांची तपासणी दोन दिवसांपासून आरोग्य विभागाने वाढवली आहे.
लातूर : थंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांची तपासणी दोन दिवसांपासून आरोग्य विभागाने वाढवली आहे. यात आरटीपीसीआर तपासणीला प्राधान्य देण्यात येत असून तपासण्या वाढवल्या तरी रूग्णसंख्येत घट दिसून येत आहे. शनिवारी (ता.२६) ६२३ तपासणीत केवळ १९ रूग्ण आढळून आले आहेत. काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्थितीत कोरोनावर नियंत्रण कायम ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने तपासणीची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला.
तातडीने निदानासाठी नागरिकांकडून जलद अँटिजेन तपासणीला प्राधान्य देण्यात येत असले तरी आरोग्य विभागाकडून अचूक निदानासाठी आरटीपीसीआर तपासणीचा आग्रह होत आहेत. यातूनच मागील दोन दिवसांत विभागाने आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या वाढवल्याचे दिसत आहे. ही संख्या वाढवली तरी रूग्णसंख्या कमी आढळून येत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे.
शुक्रवारी (ता.२५) ६४० तपासण्या केल्यानंतर ३९ रूग्ण आढळले होते. यात ३७६ आरटीपीसीआर तर २६४ अँटीजन तपासण्या होत्या. शनिवारी तपासणीचे प्रमाण जास्त ठेवण्यात आले. यात ४८४ आरटीपीसीआर व १३९ अँटिजेन तपासणी करण्यात आल्या. यात आरटीपीसीआरमध्ये दहा तर अँटीजन तपासणीत नऊ असे १९ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रविवारी (ता.२७) सुटीमुळे तपासणीची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून (ता. २८) पुन्हा तपासणी वाढवण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.
लातूर कोरोना मीटर
---
एकुण रूग्ण - २२८४१
बरे झालेले रूग्ण - २१८३६
उपचार सुरू असलेले - ३३६
एकुण मृत्यू - ६६९
आजचे रूग्ण - १९
आजचे मृत्यू - ०
संपादन - गणेश पिटेकर